Last Updated on 31 Oct 2021 7:43 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली |
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या कार्यकाळाला तीन वर्षांची मुदतवाढ देण्यात आलीय. दास यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर 2021 पर्यंत होता त्याला मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने 3 वर्षांची मुदवाढ दिलीय. यासंदर्भात गुरुवारी रात्री पुनर्नियुक्ती आदेश जारी करण्यात आलेत.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे 25 वे गव्हर्नर असलेल्या दास यांनी 11 डिसेंबर 2018 रोजी पदभार ग्रहण केला होता. ते आता पुढील तीन वर्षे किंवा पुढील आदेशापर्यंत पदावर राहणार आहेत. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने 10 डिसेंबर 2021 नंतर किंवा पुढील आदेश येईपर्यंत तीन वर्षांच्या कालावधीसाठी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून शक्तीकांत दास यांची पुनर्नियुक्ती करण्यास मान्यता दिल्याचे अधिकृत पत्रकात सांगण्यात आले आहे. यापूर्वी दास वित्त मंत्रालयात आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव होते. त्यांची 11 डिसेंबर 2018 रोजी तीन वर्षांच्या कालावधीसाठी रिझर्व्ह बँकेचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
शक्तिकांत दास यांना शासनाच्या विविध क्षेत्रांतील कामांचा मोठा अनुभव आहे आणि त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वित्त, कर आकारणी, उद्योग, पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रात महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. ते सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीधर आहेत. भारत सरकारच्या अर्थमंत्रालयातील त्यांच्या प्रदीर्घ कार्यकाळामध्ये ते तब्बल 8 केंद्रीय अर्थसंकल्प तयार करण्याशी थेट संबंधित होते. दास यांनी जागतिक बँक, आशियाई विकास बँक , न्यू डेव्हलपमेंट बँक आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेत भारताचे पर्यायी गव्हर्नर म्हणूनही काम केले आहे.









































































