Last Updated on 27 Sep 2021 6:59 PM by Sanjay Patil/Adhorekhit

मुंबई : बहुप्रतिक्षित आयसीसी टी-20 विश्व विश्वचषकाची उत्सुकता दिवसेंदिवस आणखीच शिगेला पोहचत आहे.आयपीएलनंतर लगेचच आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धा सुरु होणार आहे. क्रीडाप्रेमींमध्ये आतापासून विश्वचषकाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातच आयसीसीने आता आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी थीम साँग लाँच करत उत्सुकतेत भर घातली आहे. हे थीम साँग सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या गाण्याला ‘Live The Game’ असं नाव देत आयसीसीने त्यांच्या सोशल मीडियावर हे गाणं पोस्ट केलं आहे. विशेष म्हणजे हे गाण मेड इन इंडिया आहे.
हे गाणे आयसीसीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. हे गाणे बॉलीवूडचे प्रसिद्ध संगीतकार अमित त्रिवेदीने कंपोज केलं आहे. या गाण्यात खेळाडूंचा अॅनिमेटेड अवतार पाहायला मिळत आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली, अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटपटू राशिद खान, वेस्ट इंडिजचा कर्णधार पोलार्ड आणि ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल यात दिसत आहेत. हे गाणे सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तसेच क्रिकेट रसिकांचा यावर लाईक्सचा वर्षाव सुरु आहे.
तर या गाण्यावर तुम्हीही एक नजर फिरवाच…
टी-२० विश्वचषक स्पर्धा स्पर्धा १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान ओमान आणि यूएईत खेळली जाणार आहे. यासाठी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.
कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली १५ खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. जय शाह आणि चेतन शर्मा यांच्या उपस्थितीत संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहली (कर्णधार), रोहीत शर्मा, केएल राहुल, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दीक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी यांची निवड करण्यात आली आहे. सुर्यकुमार यादव, राहुल चहर, इशान किशन, वरुण चक्रवर्ती यांना वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर हे राखीव खेळाडू असतील, असं बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलं आहे. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा टी २० विश्वचषक संघाचा मार्गदर्शक असणार आहे.
टी-२० विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक
याआधीच टी-२० विश्वचषक स्पर्धेचे गट जाहीर झाले आहेत. पहिल्या फेरीत ८ संघ सुपर १२ मध्ये स्थान मिळवण्यासाठी खेळतील. आयर्लंड, नेदरलँड्स, श्रीलंका आणि नामिबियाला अ गटात, तर ओमान, पीएनजी, स्कॉटलंड आणि बांगलादेशला ब गटात स्थान देण्यात आले आहे. प्रत्येक गटातील फक्त अव्वल दोन संघ दुसऱ्या फेरीत प्रवेश करतील.

ओमान आणि यूएई येथे खेळल्या जाणार्या या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत आठ पात्र संघ सहभागी होणार आहेत. यातील चार संघ सुपर १२ फेरी गाठतील. २०१६ नंतरचा हा पहिला टी-२० विश्वचषक असेल. त्यावेळी वेस्ट इंडिजने इंग्लंडला पराभूत करून विजेतेपद जिंकले होते. सुपर-१०च्या गटातील सामन्यात भारताने पाकिस्तानला ६ गडी राखून पराभूत केले. उपांत्य सामन्यात भारताला विंडीजकडून पराभवाला सामोरे जावे लागले.

सुपर १२ चा पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुबईमध्ये २३ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. दुसरा सामना इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात त्याच दिवशी खेळला जाईल. तर सुपर १२ मध्ये, गट २ मधील पहिला सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईच्या मैदानावर खेळला जाईल. या दिवशी फक्त एक सामना खेळला जाईल.

सुपर १२ च्या गट १ मध्ये वेस्ट इंडीज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका यांच्या व्यतिरिक्त गट अ चा विजेता आणि गट ब चा उपविजेता संघ पहिल्या फेरीत असेल. दुसरीकडे, गट २ मध्ये, भारत आणि पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तानसोबत पहिल्या फेरीच्या गट ब चा विजेता संघ आणि गट अ चा उपविजेता संघ असेल.















































































