Last Updated on 15 Sep 2023 8:06 AM by Sanjay Patil/Adhorekhit
कवी सौमित्र (किशोर कदम) यांची कविता व्हायरल
मुंबई । मराठा आरक्षणासाठी सोमवारी रात्री सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर पत्रकार बैठक घेण्यात आली.ही पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.यानंतर सरकार आरक्षणाबाबत गंभीर नसल्याची भावना नागरिक व्यक्त केल्या जात आहेत. ‘बोलून मोकळं व्हायचं अन् निघून जायचं,असं मुख्यमंत्री म्हणाले.हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.दरम्यान,या मुद्द्यावर प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम यांनी कवितेच्या माध्यमातून मार्मिक भाष्य केलं आहे.अभिनेते,कवी किशोर कदम यांनी लिहिलेली ‘आपण बोलून निघून जायचं ..’ही कविता चर्चेचा विषय ठरत आहे.
पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
व्हायरल व्हिडीओ संवाद असा
एकनाथ शिंदे : आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं, बोलून मोकळं व्हायचं.
अजित पवार : हो.. येस
देवेंद्र फडणवीस : माईक चालू आहे.
कवी सौमित्र यांची चर्चेतील कविता
आपण बोलून निघून जायचं ..
होईल जनतेचं जे व्हायचं
आपल्याला काय..
आपण बोलुन निघुन जायचं…
आपल्याला काय..
केवढी जनता असते समोर
आपल्या जीवाला नस्ता घोर
सगळेच पक्ष लावतात जोर
कोण साधून् कोण चोर
आपली तशीच विचारधारा
जिकडे जसा वाहिल वारा
घालत राहायच्या येरझारा
जातोच निसटुन हातुन पारा
हेच लक्षण लक्षात ठेऊन
आपण येत जात ऱ्हायचं
तहाने सारखं व्याकुळ व्हायचं
जकडे झरा तिथलं प्यायचं
आपल्याला काय…
आपण पिउन निघुन जायचं
आपल्याला काय…
लोकांची पण सहनशक्ती
आपण ताणुन बघत नुस्ती
लाऊन द्यायची त्यांच्यात कुस्ती
कैसा गांव कैसी बस्ती
आपलेच सगळे कार्यकर्ते
आपले कर्ते आपले धर्ते
जिधर घुमाव उधर फिरते
त्यांच्या हातात काय उरते
उद्या परवा विचार करू
नंतर त्यांना काय द्यायचं
आधी बघू काय खायचं
लोकशाहीचंच गाणं गायचं
आपल्याला काय..
आपण गाउन निघुन जायचं
आपल्याला काय..
चोविस तास बातम्या मिळोत
चॅनल्स जाहिराती गिळोत
न्याय अन्यायाशी पिळोत
एफबी इन्स्टा सारे फळोत
खड्डे सगळे तसेच सडोत
निकाल लांबणीवरती पडोत
नशिबाशी कामं अडोत
नको तशा घटना घडोत
जे जे हवं ते ते द्यायचं
तेवढ्या पुरतं त्राता व्हायचं
कशालाही नाही भ्यायचं
आपल्याला काय..
वचनं देउन निघुन जायचं
आपल्याला काय..
रोज लोकां समोर यायचं
रोज लोकां समोर जायचं
माईक बंद चालू असो
आपण फक्तं बोलत ऱ्हायचं
आपल्याला काय ..
सौमित्र.











































































