Last Updated on 27 Sep 2025 11:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सभासद संपर्क दौऱ्यात प्रतिकदादा पाटील यांची माहिती : शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सध्या ऊस उत्पादनात २० टक्क्यांहून मोठी घट
साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १०० दिवसांवर येऊन ठेपला
आता ऊस तोडीसाठी फार प्रतीक्षा करावी लागणार नाही
सांगली । आम्ही ऊस तोडणी कार्यक्रमात अचूकता व सुधारणा करीत आहोत. या गळीत हंगामा पासून आपला ऊस कधी तुटणार आहे? याची माहिती प्रत्येक शेतकऱ्यास त्यांच्या भ्रमणध्वनी (मोबाईल) वर काही दिवस अगोदर देत आहोत, अशी माहिती राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी रेठरेहरणाक्ष,दुधारी व बिचूद येथील ऊस उत्पादक सभासद संपर्क दौऱ्यात बोलताना दिली. भर पावसातही शेतकऱ्यांनी प्रतिकदादा पाटील यांच्या संपर्क दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून हा सभासद संपर्क दौरा पार पडला. हा दौरा सुरू असतानाच पावसाने जोरदार हजेरी लावली. तरीही प्रतिकदादा पाटील यांनी दौरा न थांबविता शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडी- अडचणी समजून घेतल्या. जेष्ठ नेते बी.डी. पवार, राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब पवार, संचालक दादासाहेब मोरे, सचिव डी.एम.पाटील, जल सिंचन अधिकारी जे.बी.पाटील व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
प्रतिकदादा पाटील म्हणाले,पूर्वी साखर कारखाने १६०-१८० दिवस चालत होते. शेतकऱ्यांना ऊस तोडणीसाठी बरीच प्रतीक्षा करावी लागत होती. सध्या ऊस उत्पादनात २० टक्क्यांहून मोठी घट झाली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १०० दिवसांवर येऊन ठेपला आहे. आता ऊस तोडीसाठी फार प्रतीक्षा करावी लागणार नाही. आपण सर्वांनी आपला पिकविलेला सर्व ऊस आपल्या साखर कारखान्यास देऊन सहकार्य करावे. आपले जे-जे प्रश्न असतील ते सोडविण्यास मी कटीबद्ध आहे.

बाळासाहेब पवार म्हणाले, प्रतिकदादा पाटील यांना शेतकऱ्यांच्याबद्दल मोठा कळवळा आहे. ते गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांचे प्रश्न,अडचणी सोडवून घेऊन त्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. त्यांनी गेल्या दोन वर्षात अनेक शेतकरी हिता च्या योजना आणल्या आहेत. आपण त्याचा जरूर लाभ घ्यावा.
रेठरेहरणाक्ष येथे कृष्णेचे संचालक जे.डी. मोरे, माजी संचालक सुजित मोरे, माजी जि. प.सदस्य धनाजी बिरमुळे, माजी उपसरपंच उमेश पवार, उपसरपंच विश्वजित पाटील, दिलीप मोरे, जयवंत मोरे, निलेश पवार, संजय मोरे, चंद्रहार पवार, हणमंत मोरे, संदीप जाधव, जयसिंग मोरे, दुधारी येथे राजारामबापू बँकेचे संचालक आनंदराव लकेसर, सरपंच नागेश कदम, उपसरपंच सागर पाटील, विश्वास पाटील, आनंदराव कदम, जीवन कदम, बिचूद येथे हरीभाऊ सावंत, अशोक पाटील, चंद्रकांत मोहिते, प्रकाश पाटील, दिलीप सावंत, प्रदीप गोडसे, बाजीराव रसाळ यांच्यासह ऊस उत्पादक सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.









































































