Last Updated on 28 Oct 2023 9:25 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सातारा । मराठा आरक्षणासाठी राज्यातील विविध गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी घालण्यात येत आहे. कराड तालुक्यातील आटके गावातही हा निर्णय घेण्यात आला आहे.येथे सर्व पक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.
राजकीय दृष्ट्या जागृत व तालुक्याच्या राजकारणात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आटके गावाने घेतलेल्या या निर्णयामुळे राजकारण्याच्या चिंतेत वाढ होणार आहे. आटके गावकऱ्यांनी एकत्र येवून घेतलेल्या या निर्णयामुळे आगामी काळात हे लोण तालुकाभर पोहचण्याची शक्यता आहे.
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी उपोषण सुरू आहे त्यास समस्त आटके गावकऱ्यांनी पाठींबा व्यक्त केला आहे.
‘चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचं लक्ष्य’ मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्ष आणि नेत्यास गावात प्रवेश नाही. त्यामुळे आपली मान मर्यादा राखून गावात प्रवेश करावा. तसेच, कोणत्याही राजकीय पक्षाचे गावात बॅनर लावू नये, असा मजकूर असलेले फलक मुख्य चाैकाचाैकात लावले आहेत. ते लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.








































































