Last Updated on 05 Jun 2020 5:48 AM by
दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.
पर्यावरण दिनानिमित्त आपल्या हाती असलेले कार्य आपल्या घरुनच सुरुवात करुया. पुन्हा पुन्हा वापरात येऊ शकणार्या वस्तू जसे पेपर, काचेच्या वस्तू, अल्युमिनियम, मोटरऑईल अशांची पनुर्निर्मिती करुया. हातांनी जे काम करु शकतो ते काम इलेक्ट्रीक उपकरणाशिवाय करुया. शक्य असल्यास गरम पाण्याऐवजी थंड पाण्याचा वापर करुया या. प्लॅस्टीक पिशव्यांऐवजी परत परत वापरता येणार्या कागदी पिशव्या वापरु या. अन्न आणि भाजीपाला प्लॅस्टीकमध्ये न ठेवता अल्युमिनियम पापुद्र्यात ठेवूया. पाण्याचा गैरवापर करणे थांबवूया. घरातील रुम हिटरचा वापर न करता स्वेटर घालून इलेक्ट्रीक ऊर्जेचा वापर टाळूया. गरज नसल्यास घरातील टी.व्ही., बल्ब तसेच अन्य इलेक्ट्रीक उपकरणाचा वापर थांबवूया. घरातून बाहेर पडताना पाण्याचा हिटर, पंखा, विजेचा दिवा बंद करुया. याशिवाय आणखी एक पाऊल पुढे जाऊन, पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे काम करणार्या एखाद्या स्वयंसेवी संस्थेचे सभासद होऊन पर्यावरण वाचविण्यासाठी विविध मोहिमा राबवूया आणि या माध्यमातूनच जनजागृती करुया.
आपण अन्नाशिवाय एखादा दिवस, पाण्यावाचून एखादा तास जिवंत राहू शकतो मात्र हवेतील ऑक्सिजन शिवाय क्षणभर सुद्धा जिवंत राहू शकत नाही. आणि ऑक्सिजन निर्मितीचे सर्वात मोठे कार्य वृक्ष करीत असतात. वनस्पती स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात आणि हवेतील कार्बन डायक्साईड म्हणजे खराब हवा वायू शोषून मानवास उपयुक्त असे ऑक्सिजन म्हणजे शुद्ध हवा वायू हवेत सोडतात. त्यामुळे वनस्पती व वृक्षांची लागवड व संवर्धन करणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. जंगलतोड फार मोठय़ा प्रमाणावर होतांना जंगल वाचविण्यासाठी व लोकांमध्ये वृक्षाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी सुंदरलाल बहुगुणा यांनी ”चिपको आंदोलन” चालविले आणि त्यात यशस्वी सुद्धा झाले. वृक्षांचे महत्व अपरंपार आहे, हे आपल्या पूर्वजांनी सुद्धा जाणून होते. संत तुकाराम महाराज याविषयी म्हणतात की, ”वृक्षवल्ली, आम्हां सोयरे, वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती.” खरंच वृक्ष हे आपले सगे सोयरे, नातलग, मित्र परिवारातीलच नव्हे कां? वृक्षांच्या महत्वाविषयी आपले पूर्वज संत, महात्मे आणि समाजसुधारकांनी ज्या बाबी सांगितल्या आहेत ते सामान्यांतल्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचविणे अत्यंत महत्वाचे आहे.
जंगलतोड वाढत चालल्यामुळे दिवसेंदिवस वनाचे क्षेत्र कमी कमी होत आहे. त्यामुळे जंगलात वास्तव करून राहणारे पशू – पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. काही वर्षांनी फक्त झू पार्क मध्येच एखादा प्राणी – पक्षी बघायला मिळेल की काय अशी शंका मनात येते. पूर्वी सकाळी पक्ष्यांच्या चिवचिव – किलबिल आवाजाने जाग यायची. आजही त्याच आवाजाने जाग येते. मात्र आजचा आवाज नैसर्गिक नसून ती मोबाईलची रिंगटोन असते. मोबाईलमुळे खूप दूरवरचे मित्र, कुटुंबातील सदस्य, नातलग आणि पाहुणे हे सर्व आपल्याजवळ असल्यासारखा भास होत आहे आणि आपल्या सहवासात असलेला निसर्ग मात्र दूर गेले आहे. त्यास्तव निदान वनाचे संरक्षण करण्यात आपण यशस्वी झालो तर पशू-पक्ष्यांचे आपोआप संरक्षण होईल. आपल्या जीवनाप्रमाणे पशू-पक्ष्यांचे जीवनसुध्दा महत्वाचे आहे हे विसरून चालणार नाही
आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. येथील एक तृतियांश जनतेचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. अधिक उत्पन्न काढण्याच्या स्वार्थासाठी शेतकरी आपल्या शेतीची जुनी पध्दत बंद केली असून, रासायनिक औषध व खताचा बेसुमार वापर करीत आहेत.त्यामूळे दिवसेंदिवस जमिनीचा कस तर नष्ट होतच आहे. शिवाय त्या रासायनिक घटकांचा प्रतिकूल परिणाम मानवाच्या आरोग्यावर होऊन हानी पोहोचत आहे. डीडीटी या किटकनाशक औषधाचा अति वापर केल्यामुळे कीटकनाशक मानवाच्या शरीरात कशी पोहोचतात आणि ते पुढच्या पिढीत कसे संक्रमित होतात याचे सत्य कॉर्सने सन 1962 मध्ये सायलेंट स्प्रिंग या पुस्तकाद्वारे जगासमोर मांडले होते. उत्पादन कमी निघाले तरी चालेल परंतु रासायनिक औषध व खताचा अनावश्यक वापर टाळून सेंद्रीय खताचा वापर प्रत्येक शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. सर्वच शेतकऱ्यांनी आपली संघटना तयार करून सेंद्रीय पध्दतीने शेती करण्याचे ठरविले तरच सर्वांना त्याचा फायदा होतो, हे लक्षात घ्यावे.
नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये सौर ऊर्जा हे कधीही न संपणारी संपत्ती आहे.
भविष्यात सौर उर्जेच्या वापरात वाढ करणे म्हणजे एकप्रकारे पर्यावरणाला हातभार लावण्यासारखे आहे. पेट्रोल, डिझेल यासारख्या इंधनाचा मर्यादित साठा भविष्यकाळात संपण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा जपून वापर करण्यातच शहाणपणा आहे. सोबतच अमर्यादित अश्या सौर उर्जेचा इंधनासाठी पर्याय म्हणून वापर करण्यासाठी सुरुवात केल्यास भविष्यातील अनेक संकटापासून मुक्तता मिळू शकेल. आज ज्या सौर उर्जेचा वापर नगण्य स्वरूपात आहे, म्हणजेच पूर्णपणे वाया जात आहे. त्याचा अनेक माध्यमातून विविध साधनाच्या मदतीने वापर करता येऊ शकते आणि पर्यावरणाचा असमतोल थांबविता येऊ शकेल. सौर बंब, सौर चूल, आणि सौर उर्जेवर चालणाऱ्या विविध उपकरण यांचा जनतेनी जास्तीत जास्त वापर कसे करू शकतील? यांविषयी शासनाने महत्वाचे फायदेशीर निर्णय घेणे अपेक्षित आहे.
आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर असताना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करुन चालणार नाही. निसर्गावर अन्याय करतो हे आपण त्सुनामी, नरगिससारखी सागरी वादळे, भूकंप, ढग फूटी, महापूर, दुष्काळ रोगराई अशा अनेक नैसर्गिक प्रकोपाद्वारे जाणवला आहे. हे सर्व लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्तीने वरीलप्रमाणे उपक्रम राबविल्यास आपण पर्यावरणाचा समतोल राखू आणि खर्या अर्थाने समृद्धीच्या दिशेने वाटचाल करु.














































































