Last Updated on 18 Dec 2025 3:47 PM by Sanjay Patil/Adhorekhit
शिल्पकलेतील भीष्माचार्य हरपले
नवी दिल्ली । आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या १०१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीत संसद भवनाच्या प्रांगणात राम सुतारांनी साकारलेली शिल्प आहेत. शिल्पकलेतील भिष्माचार्य अशी ओळख असलेले राम सुतार यांनी देशभरातील अनेक मोठ्या पुतळ्यांचे शिल्प साकारले.
राम सुतार यांना पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण सारख्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः रुग्णालयात त्यांची भेट घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला होता. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र अभिमान गीत देखील गायले होते.
आपल्या अतुलनीय कलेने महाराष्ट्र तसेच देशाचे नाव जगात उंचावणारे प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांचा महाराष्ट्रातील धुळे येथे १९ फेब्रुवारी १९२५ मध्ये यांचा जन्म झाला. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये त्यांनी शिल्पकलेचे धडे घेतले. शिल्पकलेतील भिष्माचार्य अशी ओळख असलेले राम सुतार यांनी देशभरातील अनेक मोठ्या पुतळ्यांचे शिल्प साकारले.
त्यांनी घडवलेल्या महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याचंही खूप कौतुक झालं आहे. फ्रान्स, अमेरिका, इटली, अर्जेंटिना, रशिया, इंग्लंड, मलेशिया, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, चीन, इजिप्त, पोलंड, दक्षिण आफ्रिका आणि इतर अनेक शहरांसह जगभरातील ४५० हून अधिक शहरांमध्ये त्याची स्थापना करण्यासाठी निवड देखील झाली आहे.
राम सुतार यांना १९९९ मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर २०१८ मध्ये पद्मभूषण हा देशातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कारही देण्यात आला. संसद परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासह, स्टॅच्यू ऑफ युनिटीसारख्या गगणाला भिडणाऱ्या पुतळ्यांचे शिल्प त्यांनी साकारले.
तपस्वी शिल्पकार काळाच्या पडद्याआड – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केले आहे की “ज्येष्ठ शिल्पकार महाराष्ट्रभूषण, डॉ. राम सुतार यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांचे पुत्र अनिल सुतार यांना दूरध्वनी करून शोकसंवेदना व्यक्त केल्या आणि त्यांना सांत्वना दिली.”
राम सुतार यांना श्रद्धांजली देताना फडणवीस म्हणाले, “वयाच्या 100 व्या वर्षी सुद्धा ते इंदू मिल येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामात गुंतले होते. संसद भवन परिसरात सुद्धा त्यांनी तयार केलेले अनेक पुतळे आहेत.
“आपले आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले, आपले वारकरी संत अशा मोठ्या मांदियाळीच्या शिल्पांना आकार देण्याचे काम त्यांनी केले. या शिल्पांच्या माध्यमातून त्यांची कला शतकानुशतके आपल्या स्मरणात राहील आणि ते प्रत्येक शिल्प पाहताना त्यांचेच स्मरण होईल,” असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.














































































