Last Updated on 06 Nov 2021 11:39 AM by Sanjay Patil/Adhorekhit
अयोध्या |
दीपावलीच्या पूर्वसंध्येला राम नगरी अयोध्येतील शरयू नदीचा घाट 12 लाख दिव्यांनी उजळून निघाला. राम कि पौडी नजीकच्या परिसरातील 32 घाटांवर हे दिवे प्रज्ज्वलित करण्यात आले होते. अयोध्येत पाचव्या दीपोत्सवानिमित्त योगी सरकारने आपलाच विक्रम मोडून बुधवारी नवा विश्वविक्रम रचला. यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची टीम अयोध्येत हजर होती.
दिवाळीच्या पूर्वसंध्येला रामनगरी अयोध्येत त्रेतायुग जिवंत झाल्याचा भास होत होता. श्रीरामांच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर सुमारे 12 लाख मातीच्या दिव्यांनी उजळून निघाले होते. प्रतिकात्मक पुष्पक विमान असलेल्या हेलिकॉप्टरमधून राम, सीता आणि लक्ष्मणाचे आगमन झाल्यावर संपूर्ण परिसर रामनामाच्या जयघोषाने निनादून गेला होता. शंख, वाद्यांचे मंगलध्वनी आणि आकाशातून होणारी पुष्पवृष्टी यामुळे अगदी त्रेता युग अवतरल्यासारखे वातावरण होते. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम-सीता, लक्ष्मणाच्या वेशभूषेतील कलाकारांचे प्रतिकात्मक पूजन केले. त्यानंतर हे सर्वजण रथातून रामकथा पार्क येथे पोहचले. तेथे मुख्यमंत्र्यांनी रामाचा राज्याभिषेक केला. यावेळी उत्तरप्रदेश सरकारमधील मंत्री आणि केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी उत्तरप्रदेशातील 15 कोटी गरिबांना होळीपर्यंत दरमाह निःशुल्क रेशन देण्याची घोषणा केली. तसेच रामजन्मभूमीकडे जाणाऱ्या 3 प्रमुख रस्त्यांना स्व. अशोक सिंघल, स्व. कल्याण सिंह आणि तिसऱ्या मार्गाला बलिदानी कारसेवकांचे नाव देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी केली.
उत्तरप्रदेशात भाजप सरकारच्या सत्ता स्थापनेनंतर, 2017 मध्ये अयोध्या राम की पैडी येथे दीपोत्सव कार्यक्रम सुरू झाला आणि प्रथम सुमारे 1,80 हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले. यानंतर 2018 मध्ये 3,01,152, नंतर 2019 मध्ये 5,50 हजार त्यानंतर 2020 मध्ये 5,51 हजार दीवे लावण्यात आले होते. पण आता 2021 मध्ये अयोध्येत सुमारे 12 लाख दिवे प्रज्ज्वलीत करून विश्वविक्रम प्रस्थापित करण्यात आला.














































































