Last Updated on 24 Nov 2025 8:14 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतील ही-मॅन अर्थात अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. ८९ वर्षीय त्यांनी सोमवारी दुपारी त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर विले पार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाला एका युगाच्या अंताचा संकेत म्हटले आहे.
धर्मेंद्र यांना काही दिवसांपूर्वी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. धर्मेंद्र डॉक्टरांच्या देखरेखीखाली होते, त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं त्यांचा मुलगा सनी देओल यांनं सांगितलं होतं. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिश्चार्ज देण्यात आला होता.त्यानंतर धर्मेंद्र यांच्यावर घरीच उपचार करण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला होता. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. ते ८९ वर्षांचे होते.
मुंबईतील विलेपार्लेच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा सनी देओलने धर्मेंद्र यांना मुखाग्नी दिला. यावेळी अंत्यसंस्कारासाठी अभिनेता अमिताभ बच्चन, सलमान खान, संजय दत्त, आमिर खान यांच्यासह सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.
बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र गेल्या सहा दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. त्यांचा ‘इक्किस’ हा शेवटचा चित्रपट येत्या २५ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. भारतीय सिनेसृष्टीतील महान अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांनी १९६० मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात केली. २०१२ मध्ये भारत सरकारकडून त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी ‘यादों की बारात’, ‘मेरा गाव मेरा देश’, ‘नौकर बीवी का’, ‘फूल और पत्थर’, ‘पत्थर’ आणि ‘घायल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक संदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. धर्मेंद्रजी यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला. ते एक अभूतपूर्व अभिनेता होते, त्यांनी ज्या भूमिका केल्या, त्यामाध्यमातून त्यांनी लोकांच्या मनात घर केलं”, असे मोदींनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून शोक संदेश
भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारा लखलखता तारा निखळल्याची शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. स्वप्नाळू, युवा नायक ते तडफदार-बलंदड नायक म्हणून साकारलेल्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि पुढे बॉलिवुडचा हि-मॅन म्हणून लौकीक मिळवेलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र चित्रपट रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात की, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा हिंदी चित्रपट सृष्टीतला प्रवास वैशिष्ट्यपूर्ण राहिला. कृष्ण- धवल काळ ते रंगीत आणि अलिकडच्या तांत्रिकदृष्ट्या आधुनिक प्रवाहात ते कार्यशील राहिले. ते चित्रपट सृष्टीतील बदलाचे, भरभराटीपासून ते आतापर्यंतच्या काळाचे महत्वाचे साक्षीदार राहिले. नायक म्हणून तरूण वयात सालस, स्वप्नाळू नायक ते विविध चित्रपटात वाट्याला आलेल्या भूमिका त्यांनी अभिनयाने आयकॉनिक ठरवल्या. शोले चित्रपटातील पडद्यावरील वीरू प्रमाणेच ते प्रत्यक्षातही मैत्र जपणारे होते. सहृदय आणि जुन्या-नव्या पिढीला जोडणारे, अनेकांसाठी आधार, मार्गदर्शक व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती होती. या क्षेत्रातील ज्येष्ठत्व ते तितक्याच उमद्यापणाने मिरवत असत. मध्यंतरी त्यांनी लोकसभेत भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून बिकानेरचे प्रतिनिधीत्व केले होते. पण त्यांनी चित्रपटसृष्टी आणि अभिनय, या क्षेत्रातील प्रयोगशीलता यांनाच अधिक प्राधान्य दिले. सुमारे तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. एकाच वर्षांत ९ हिट चित्रपट देण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत ते चित्रपट सृष्टीत सक्रिय राहिले. त्यांच्या निधनाने आपल्या चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारा तारा निखळला आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनामुळे देओल कुटुंबीयांसह, त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा आघात झाला आहे. आम्ही या सर्वांच्या दुःखात सहभागी असून त्यांना ईश्वराने आघात सहन करण्याची ताकद द्यावी, अशी प्रार्थना करतो. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनामुळे चित्रपट सृष्टीची मोठी हानी झाली असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
चित्रपटसृष्टीतील अभिनयाचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड
उपमुख्यमंत्री पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, धर्मेंद्र यांच्या अभिनयात नैसर्गिकता, साधेपणा आणि मनाला भिडणारी भावनिक ताकद होती. ‘शोले, ‘चुपके चुपके, ‘अनुपमा, ‘सत्यकाम, ‘दिल्लगी’ अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. विशेषतः ‘शोले’ मधील त्यांनी साकारलेली ‘वीरू’ची भूमिका रसिकांच्या मनात अजरामर आहे. धर्मेंद्र यांचा चित्रपट प्रवास म्हणजे मेहनत, समर्पण आणि कलाविश्वाप्रती असलेल्या निःस्वार्थ प्रेमाचे प्रतीक आहे. त्यांनी अनेक पिढ्यांतील प्रेक्षकांना आपल्या अभिनयातून निखळ आनंद दिला. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे.धर्मेंद्र यांनी आपल्या दीर्घ आणि उल्लेखनीय कारकिर्दीत आठ वेळा ‘फिल्मफेअर पुरस्कार’ मिळवले होते. त्यांचे देखणे व्यक्तिमत्त्व आणि दमदार अभिनयामुळे त्यांना ‘हिंदी सिनेमा’चा ‘ही-मॅन’ म्हणून ओळख मिळाली होती. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे कुटुंबिय, चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री पवार यांनी धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.









































































