Last Updated on 14 Oct 2024 11:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हरहुन्नरी कलाकार अतुल परचुरे यांचं निधन झाले आहे. वयाच्या 57 व्या वर्षी अतुल परचुरे यांनी अखेरचा श्वास घेतला. अतुल परचुरे यांनी कॅन्सरशी लढा दिला होता. कॅन्सरवर मात केल्यानंतर त्यांनी पुन्हा जोमाने काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे.
त्यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांनी मराठी नाटकांमधील आपल्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य निर्माण केले होते. अतुल परचुरे यांनी हिंदीत कपील शर्मा शो मध्ये देखील काम केले होते. त्यांच्या या कामाला देखील लोकांची चांगली पसंती मिळाली होती. अळी मिळी गुपचिळी, होणार सून मी ह्या घरची, जागो मोहन प्यारे, भागो मोहन प्यारे या मालिकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. तसेच त्यांनी अनेक चित्रपट व नाटकांमध्ये सुध्दा काम केले. अतुल परचुरे यांनी कापूसकोंड्याची गोष्ट, गेला माधव कुणीकडे, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुझं आहे तुजपाशी, नातीगोती, व्यक्ती आणि वल्ली, टिळक आणि आगरकर या प्रसिद्ध नाटकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर मराठी प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलं आणि त्यांच्या कामाचं कौतुकही केलं.










































































