Last Updated on 21 Oct 2023 9:24 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । बैलगाडी शर्यतीची अनेक मैदानं गाजवणारा हुबालवाडीकरांचा ‘स्पीड किंग’ ‘हारण्या’ चा गुरुवारी लंपी या आजाराने मृत्यू झाला.परिसरातील शर्यत प्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेल्या ‘हारण्या’चं निधन झाल्याचे हुबालवाडी परिसरात समजताच शर्यतप्रेमींत हळहळ व्यक्त होत आहे.
हुबालवाडी येथील अण्णासो तानाजी हुबाले व सुशांत शिंदे यांनी ‘हारण्या’ ला २ वर्षांपूर्वी ४५ हजार रुपयांना खरेदी केलं होतं.त्याला काही काळ शर्यतीचे प्रशिक्षण देण्यात आले.’हारण्या’ शर्यतीसाठी तयार झाल्यानंतर त्याला मैदानात उतरवण्यात आलं.बघता-बघता ‘हारण्या’ नं मैदानं गाजवायला सुरवात केली.त्याने आतापर्यंत ३०-३२ मैदानात सहभाग घेतला होता.त्यानं आमदार केसरी,कोरेगाव केसरी,जयंत केसरी,कृष्णा केसरी असे अनेक ‘किताब मिळवले.

अनेक मैदानं गाजवू लागलेल्या ‘हारण्या’ च्या नावाचा डंका सर्वदूर पसरला.त्यादरम्यान मुंबई येथील शर्यत शौकीनाने ‘हारण्या’ला २५ लाखाला मागितले.पण ‘हारण्या’वर जीवापाड प्रेम करणाऱ्या अण्णासो हुबाले यांनी त्यास स्पष्ट नकार दिला.
राज्यभर लंपीची साथ मोठ्याप्रमाणात सुरु आहे.गेल्या २१ दिवसापूर्वी या साथीची ‘हारण्या’ ला लागण झाली.त्याच्यावर गेल्या २१ दिवसांपासून उपचार सुरु होते.पण,आज (गुरुवारी) सकाळी अनेक मैदान गाजवणारा हुबालवाडकरांचा ‘स्पीड किंग’ ‘हारण्या’ चा मृत्यू झाला.परिसरातील शर्यत प्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेल्या ‘हारण्या’ अचानक निघून गेल्यामुळे हुबाले व शिंदे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.हुबाले यांच्या शेतातच ‘हारण्या’ वर अंत्यसंस्कार करण्यात आले.











































































