Last Updated on 02 Mar 2022 9:09 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली ।
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनविण्यात आलेल्या भारताच्या सर्वात महत्वपूर्ण आणि सामरिक दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या अटल बोगदा रोहतांगचे नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदले गेले आहे आणि याला मान्यता देण्यात आली आहे.
समुद्र सपाटीपासून 10,044 फुट उंचीवर असलेल्या अटल बोगद्याला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने अधिकृतपणे जगातील सर्वात लांब दळणवळण बोगदा म्हणून मान्य दिली आहे. या बोगद्याची लांबी 9.02 किलोमीटर आहे.
हा हिमालयाच्या पीरपंजालच्या टेकड्या फोडून, जवळपास दहा वर्षांत सीमा रस्ते संघटना-बीआरओने तयार केला आहे. हा बोगदा बांधण्याची घोषणा तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 2002 मध्ये आदिवासी जिल्हा लाहौल – स्पितीचे मुख्यालय केलांग येथे केली होती.
या नंतर अनेक काळ अडकून पडलेला हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कटिबद्धतेमुळे 2020 मध्ये पूर्ण झाला. या बोगदा तयार झाल्याने मनाली ते लेह दरम्यान वाहतुकीचे अंतर जवळपास 45 किमी ने कमी झाले आहे. तसेच या मार्गावरील प्रवासाचा वेळ पाच तास कमी झाला आहे.










































































