Last Updated on 23 Aug 2022 6:01 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली | भारत हा जगातली सर्वात मोठी स्टार्ट परिसंस्था असलेला तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. आत्मनिर्भर आणि नव भारताचा कणा मजबूत करणारे स्टार्टअप्स तसेच युनिकॉर्नची संख्या गेल्या सहा वर्षांत अतिशय वेगाने वाढली आहे.
2016 साली स्टार्ट अप इंडिया उपक्रमाची सुरुवात झाली, तेव्हापासून 3 ऑगस्ट 2022 पर्यंत देशात 75 हजार स्टार्टअप्सना मान्यता देण्यात आली आहे . यापैकी 49 टक्के स्टार्टअप्स द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरांमध्ये आहेत. या स्टार्टअप्समुळे 7.46 लाख रोजगार उपलब्ध झाले आहेत आणि त्यात वार्षिक ११० टक्के दराने वाढ होते आहे.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान म्हणजेच स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होणाऱ्या आठवड्यात ही कामगिरी महत्वपूर्ण असल्याचे म्हटले आहे. सुरुवातीच्या 10 हजार स्टार्टअप्सना 808 दिवसात मान्यता मिळाली होती, तर त्यानंतरच्या 10 हजार स्टार्टअप्सना केवळ 156 दिवसांमध्येच मान्यता देण्यात आली आहे.
सरासरी हिशोब केला तर दररोज 80 पेक्षा जास्त स्टार्टअप्सना मान्यता दिली जाते आहे. हा दर जगात सर्वात जास्त आहे. 2016 या वर्षात केवळ 471 स्टार्टअप्स सुरू झाले होते तर 2021 मध्ये 20,160 स्टार्टअप्स सुरू झाले. 2022 च्या सुरुवातीच्या आठ महिन्यात 14 हजार 300 हून अधिक स्टार्टअप्सना मान्यता देण्यात आली आहे. देशात युनिकॉर्नची संख्या 103 वर पोहोचली आहे , तर दर 10 व्या दिवशी एक नवा युनिकॉर्न तयार होतो आहे.










































































