Last Updated on 14 Jun 2023 11:14 AM by Sanjay Patil/Adhorekhit
दि.14 जून ते 17 जून या कालावधीमध्ये उपसाबंदी आदेश
दि. 18 ते 20 जूनपर्यंत उपशास मान्यता
सांगली । कोयना धरणातून कमी करण्यात आलेला विसर्ग तसेच कृष्णा नदीने गाठलेल्या तळामुळे सांगली जिल्ह्यात उपसाबंदी लागू करण्यात आली आहे.कृष्णा नदीतून शेतीसाठी खासगी उपसा करणाऱ्या सर्व योजनांवर उपसाबंदी आदेश जारी करण्यात आला आहे.केवळ पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करणाऱ्या योजना सुरु राहणार आहेत.आजपासून (14 जून) उपसाबंदी आदेश लागू होणार असून तो 17 जूनपर्यंत असेल.
दि.14 जून ते 17 जून या कालावधीमध्ये पिण्याचा पाणीपुरवठा सोडून इतर कारणांसाठी कृष्णा नदीतून उपसा केल्यास संबंधितांचा पाणी परवाना व विद्युत पुरवठा एक वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येणार आहे. तसेच सामग्री जप्त करून पुढील कारवाई करण्यात येईल याची गांभीयाने नोंद घेवून उपलब्ध होणा-या पाण्यावर कृष्णा नदीवरील लाभक्षेत्रातील उभी असणारी पिके जोपासण्यासाठी आधुनिक सुक्ष्म सिंचनाचा वापर करून फक्त ऊभ्या पिकांचे नुकनास होऊ नये, या दृष्टिने नियोजन करून जलसंपदा विभागास सहकार्य करावे. असेही पाटबंधारे विभागाच्या आदेशात म्हटले आहे.ताकारी योजना आजपासून बंद करण्यात आली आहे, तर केवळ टेंभू आणि म्हैशाळ अंशतः सुरू आहेत.
धरणातील मर्यादित पाणी साठ्याचा विचार करून बिगरसिंचन पाणी वापरकर्त्यांनी सांडपाणी/औद्योगिक वापरातील पाणी,थेट नदीत सोडून पाणीसाठा प्रदूषित करू नये.प्रदूषित पाणी वाहून जाण्यासाठी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध नसल्याने, सर्व संबधीतानी याची दक्षता घेऊन पाणीनाश टाळणेस सहकार्य करावे असे आवाहन सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले आहे.दि. 18 ते 20 जूनपर्यंत उपशास मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान,कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा व भोगावती नद्यांच्या दोन्ही तीरावरील भागात शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या यंत्रावर दि. १३ पासून उपसाबंदी करण्यात येत आहे.
दरम्यान, कोयना धरणातून पिण्यासाठी एक टीएमसी पाण्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे मोसमी पावसाचे आगमन लांबल्यास कोयना धरणामध्ये केवळ दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे कोयनेतील पाण्याचे जपूनच नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे कोयना धरणातून विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या 1 हजार 50 क्युसेकने विसर्ग सुरु आहे.










































































