Last Updated on 06 Oct 2021 3:35 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई :
महाविकास आघाडीकडून येत्या 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणात महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे उत्तर प्रदेशातील लखीमपूर इथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
यादिवशी अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक सेवा सोडून इतर सर्व दिवसभर बंद राहिल, मंत्री जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर याबाबत माहिती दिली. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लखीमपूर घटनेतील हिंसाचाराबद्दल शोक व्यक्त करण्यात आला शेतक-यांवर झालेल्या अमानुष हिंसाचार प्रकरणी सर्व मंत्र्यांनी दोन मिनीटे उभं राहून मृतांना श्रद्धांजली वाहिली.
महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्याला महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसनेही सहमती दर्शवली आहे. लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून, येत्या 11 ऑक्टोबरला हा बंद पुकारण्यात आला आहे.
महाराष्ट्र बंद कसा असणार?
जयंत पाटील यांनी यावेळी बंदचे स्वरुपही स्पष्ट केले.ते म्हणाले,या बंद दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरूच राहतील.यात रुग्णवाहिका, दूध आणि इतर आवश्यक वस्तूंची वाहतूक सोडून हा बंद पाळला जाईल.आघाडीच्या वतीने हा निर्णय हा घोषित करण्यात येत आहे.हा बंद सरकार म्हणून नसेल.मी राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष,बाळासाहेब थोरात विधीमंडळ नेते म्हणून आणि एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वतीने या बंदची घोषणा करत आहोत.पक्षाच्या वतीने हा बंद पुकारण्यात येतोय.
लखीमपूर खेरी घटनेसंदर्भात मंत्रिमंडळाकडून खेद व्यक्त
उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथील घटनेत शेतकऱ्यांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूसंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाने खेद व्यक्त करण्याचा ठराव केला. यावेळी मंत्रिमंडळाने दोन मिनिटे उभे राहून मरण पावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली देखील वाहिली. यासंदर्भात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रारंभी निवेदन केले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अनुमोदन दिले.










































































