Last Updated on 18 May 2025 7:34 PM by Sanjay Patil/Adhorekhit
हवामान विभागाकडून अलर्ट : या जिल्ह्यांना यलो अलर्ट, तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
मुंबई । कोकण, मध्य महाराष्ट्रात १९ ते २५ मे दरम्यान वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २२ मेच्या सुमारास कर्नाटक किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता आहे. परिणामी काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात राज्यातील विविध भागांत अवकाळी पावसाने मुसळधार हजेरी लावली होती. त्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने १९ ते २५ मे दरम्यान महाराष्ट्रासाठी तीव्र हवामानाचा इशारा जारी केला आहे. त्यानुसार राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. कर्नाटक किनाऱ्याजवळ दि. २२ मेच्या सुमारास कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन उत्तरेकडे सरकत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १९ ते २५ मे दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्रातील लगतच्या घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे-
या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
पुणे, सांगली, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यांना रविवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय नाशिक, कोल्हापूर, सातारा, मराठवाडा, विदर्भासह दक्षिण कोकणातही पुढील चार दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे.
या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. कमी पातळीवरील भागात पाणी साचणे, वाहतूक कोंडी, रेल्वे आणि बस सेवांमध्ये विलंब आणि काही ठिकाणी भूस्खलनाची शक्यता आहे. तसेच या पावसामुळे शेतीपिकांचे पुन्हा एकदा मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
अंदमानात मान्सूनचे आगमन
अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनचे आगमन झाले असून, या ठिकाणी सध्या हलक्या स्वरुपाचा पाऊस होत आहे. यानंतर पुढील तीन ते चार दिवसांत मान्सून दक्षिण बंगालच्या उपसागरात आणि अंदमानात वाटचाल करणार आहे. नियोजित वेळेच्या एक आठवडा आधीच मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. पुढील काही दिवसात मान्सून दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, अंदमान निकोबारसह मध्य बंगालच्या उपसागरात विस्तार करेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यानंतर हळूहळू केरळ आणि महाराष्ट्राकडे मान्सून वाटचाल सुरू करण्याची शक्यता आहे.














































































