Last Updated on 17 Oct 2024 7:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांची माहिती
सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारखान्याने दिवाळीसाठी १९ टक्के बोनस देण्याचा कामगार युनियनशी चर्चा करून निर्णय घेतला आहे. ही बोनसची एकूण रक्कम रुपये १० कोटी ८० लाख दि.२४ ऑक्टोबर रोजी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे, अशी माहिती राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी दिली.
लोकनेते राजारामबापू पाटील यांनी १९६९ साली वाळवा तालुक्याच्या विकासाला चालना देण्यासाठी साखराळेच्या माळावर जे साखर कारखान्याचे रोपटे लावले त्याचा आज वटवृक्ष झालेला आहे. सध्या राजारामबापू साखर कारखाना राज्यातील,देशातील एक अग्रेसर साखर कारखाना म्हणून ओळखला जातो. कारखान्याच्या प्रगतीमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्याबरोबर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. कारखान्याने सातत्याने कामगारांच्या हिताची जपणूक केली आहे. चारही युनिटमधील १ हजार ९१९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना या बोनसचा लाभ होणार आहे. सध्या कारखान्यात ऑफ सिझनची कामे गतीने सुरू आहेत. कारखाना वेळेवर सुरू करून ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा गळीत हंगाम यशस्वी करू, असा विश्वास प्रतीक पाटील यांनी व्यक्त केला.
हेही वाचा – मतदार यादीत नाव नोंदणीची १९ ऑक्टोबरपर्यंत संधी
कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील,कार्यकारी संचालक आर.डी.माहुली, महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सरचिटणीस शंकरराव भोसले, वाळवा तालुका राष्ट्रीय साखर कामगार संघाचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण,कार्याध्यक्ष तानाजीराव खराडे,कामगार कल्याण अधिकारी महेश पाटील,एचआर मॅनेंजर अनिलकुमार पाटील,मुख्य लेखापाल संतोष खटावकर प्रामुख्याने बैठकीस उपस्थित होते.










































































