Last Updated on 16 Apr 2025 2:14 PM by Sanjay Patil/Adhorekhit
आयएमडीचा नैऋत्य मान्सून हंगामी पावसाचा दीर्घकालीन अंदाज
नवी दिल्ली | उन्हाच्या झळा वाढत असतानाच हवामान विभागाकडून दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. २०२५ सालचा नैऋत्य मोसमी पाऊस (जून ते सप्टेंबर) ‘सामान्यपेक्षा जास्त’ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचे सचिव एम. रविंद्रन यांनी वर्तवला आहे. यंदा सरासरीच्या १०५ टक्के पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, १९७१ ते २०२० दरम्यान देशात सरासरी ८७ सें.मी. पाऊस पडत आला आहे. त्याच्या तुलनेत यंदा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अंदाजात ±५ टक्के बदल होण्याची शक्यता गृहित धरली आहे.
हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार
एल निनो-ला निना परिस्थिती सध्या तटस्थ आहे, पण वातावरणीय परिसंस्थेत ला निनोसदृश लक्षणं आढळून येत आहेत.
हिंदी महासागरावरही IOD (हिंद महासागर द्विध्रुवीय) स्थिती तटस्थ आहे आणि ही स्थिती मान्सून दरम्यान कायम राहण्याची शक्यता आहे.
युरेशिया व उत्तर गोलार्धातील बर्फाच्छादनात घट झाल्याचे निरीक्षण. याचा परिणाम भारतीय मान्सून सकारात्मक स्वरूपात होतो, असा इतिहास आहे.
हवामान खात्याच्या ‘मान्सून मिशन क्लायमेट फोरकास्ट सिस्टीम’ने (MMCFs) सादर केलेल्या नवीन नमुन्यांनुसार, पावसाचे प्रमाण समाधानकारक असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आगामी अपडेट मे अखेरीस
हवामान खातं मे महिन्याच्या अखेरीस अधिक अद्ययावत अंदाज प्रसिद्ध करणार आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या नियोजनासाठी शेतकऱ्यांनी वेळेवर पावले उचलण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
शेतीसाठी यंदाचा पाऊस ‘सुवर्णसंधी’ ठरू शकतो!
हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान देशात सरासरीच्या १०५ टक्के म्हणजेच “सामान्यपेक्षा जास्त” पाऊस होणार आहे. हा अंदाज जर खरा ठरला, तर शेतकऱ्यांसाठी हा एक सुवर्णक्षण ठरू शकतो. कारण पावसावरच खरीप हंगामाचं भवितव्य अवलंबून असतं.
कसा असेल शेतीसाठी यंदाचा पाऊस?
✅ पेरणी वेळेवर होण्याची शक्यता
मान्सून वेळेत सुरू झाल्यास सोयाबीन, भात, मका, मूग यासारख्या खरीप पिकांची पेरणी योग्यवेळी होईल. यामुळे पीक चक्र व्यवस्थित राहील.
✅ पाणीटंचाई कमी होण्याची अपेक्षा
जलसाठे भरून निघाल्यास सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होईल. याचा फायदा भातशेती, ऊस आणि इतर सिंचनाधारित पिकांना होईल.
✅ खत आणि बी-बियाण्यांची मागणी वाढणार
चांगल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी अधिक उत्पादनक्षम पिकांकडे वळतील. यामुळे कृषी सेवाभागालाही गती मिळणार आहे.
✅ किडरोग व साठवणूक यंत्रणांची तयारी गरजेची
जास्त पावसामुळे काही ठिकाणी पाणथळपणा, बुरशी, किडरोग वाढू शकतात. यासाठी कृषी विभागाने वेळेत मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.
✅ बाजारभावावर सकारात्मक परिणाम
जास्त उत्पादन झाल्यास पुरवठा वाढेल, आणि ग्राहकांसाठी अन्नधान्य स्वस्त होण्याची शक्यता आहे.
पण काळजीही तितकीच!
पाऊस जास्त प्रमाणात झाला, तर काही ठिकाणी पूरस्थिती किंवा पीक नासाडी होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्थानिक हवामान खात्याच्या सूचनांकडे लक्ष द्यावं आणि आवश्यक त्या पूर्वतयारी करून ठेवावी.
“हवामानाची कृपा असेल तर शेतकरी सुखी राहील” – हे वाक्य यंदा खरं ठरू शकतं. परंतु फक्त निसर्गावर विसंबून न राहता नियोजन आणि आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करणं हेच यशाचं गमक ठरणार आहे.










































































