Last Updated on 13 Sep 2023 7:23 PM by Sanjay Patil/Adhorekhit
हाइलाइट्स
सरकार 75 लाख मोफत गॅस कनेक्शन देणार
उज्ज्वला योजनेंतर्गत कनेक्शन होतील उपलब्ध
तीन वर्षांत केले जातील 1650 कोटी रुपये खर्च
नवी दिल्ली । केंद्र सरकारने देशातील 75 लाख महिलांसाठी मोफत गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत याविषयीचा निर्णय घेण्यात आला.ऐन सणासुदीच्या तोंडावर केंद्र सरकारने ही आनंदवार्ता दिली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत एलपीजी कनेक्शनसाठी अनुदान देण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत पुढील तीन आर्थिक वर्षात 75 लाख एलपीजी कनेक्शन दिले जातील.यामुळे सरकारी तिजोरीवर 1,650 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकारांना सांगितले की,जगभरातील एजन्सींनी उज्ज्वला योजनेचे कौतुक केले आहे.यामुळे महिलांच्या जीवनात मोठा बदल झाला असून पर्यावरणाचेही रक्षण झाले आहे.या योजनेंतर्गत आतापर्यंत 9.60 कोटी गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले आहे. पुढील तीन आर्थिक वर्षात आणखी 75 लाख जोडण्या देण्यात येणार आहेत.याचा फायदा गरीब कुटुंबांना होणार आहे.पहिला रिफिल आणि शेगडी मोफत दिला जातो.त्याचा खर्च तेल विपणन कंपन्या उचलतात.मंत्रिमंडळाने ई-कोर्ट प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यालाही मान्यता दिली आहे.यासाठी 7210 कोटी रुपये खर्च येणार आहे.
सिलेंडरच्या किंमती झाल्या कमी
रक्षाबंधनाच्या निमित्ताने सरकारने सर्व एलपीजी ग्राहकांसाठी सिलिंडरच्या दरात 200 रुपयांची सूट दिली होती.उज्ज्वला योजनेत 200 रुपये सबसिडी आधीच दिली जाते. या कपातीनंतर दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत सर्वसामान्य ग्राहकांसाठी 903 रुपये आणि उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी 703 रुपयांवर आली आहे. निवडणुकीच्या वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही दिलासा मिळण्याची शक्यता होती. मात्र कच्च्या तेलाच्या किमतीत नुकत्याच झालेल्या वाढीमुळे सध्या तरी याला वाव असल्याचे दिसत नाही. कच्च्या तेलाच्या किंमतीने मंगळवारी 10 महिन्यांचा उच्चांक गाठला. गेल्या वर्षी मे महिन्यापासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.








































































