Last Updated on 29 Nov 2024 8:11 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सातारा । विधानसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचंड विजय होऊन, ५ दिवस झाले असले, तरीही अद्याप मुख्यमंत्री आणि सत्तावाटपावर अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही.
महायुतीतल्या तिन्ही घटक पक्षांच्या प्रमुखांची काल नवी दिल्लीत भाजपा पक्षश्रेष्ठींसोबत बैठक झाली. मात्र, या बैठकीनंतर अंतिम निर्णय जाहीर होणं अपेक्षित होतं, ते झालेलं नाही. इतर बोलणी मुंबईत तिन्ही नेत्यांच्या बैठकीत होतील, असं सांगितलं गेलं. ही बैठक आता येत्या १-२ दिवसात होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा जिल्ह्यात दरे या आपल्या मूळगावी गेले आहेत.
दुसरीकडे भाजपा विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठीची बैठक मुंबईत होणार आहे.या नेत्याची निवड झाल्यावरच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर होईल, अशी शक्यता आहे.
महायुतीत मतभेद नसून मंत्रीपदं आणि खात्यांवर चर्चा सुरु आहे – भरत गोगावले
दरम्यान, महायुतीत मतभेद नसून मंत्रीपदं आणि खात्यांवर चर्चा सुरु आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते भरत गोगावले यांनी दिली आहे. योग्य मंत्रीपदांची अपेक्षा करणं आणि त्यासाठी वाटाघाटी यात काही गैर नसल्याचं ते म्हणाले. आगामी मुंबई महापालिका निवडणुका निवडणुकीतही, आम्ही महायुती म्हणूनच लढू, असंही गोगावले यांनी सांगितलं.









































































