Last Updated on 29 Oct 2023 9:37 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अधोरेखित ऑनलाइन डेस्क । मराठा समाजाला आरक्षण मिळावे,यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा वाढत आहे. राज्यातील अनेक गावांनी आमदार,खासदार नेते व पुढारी यांना गावबंदी करण्यात आली आहे.ठिकठिकाणी मराठा युवकांनी एकत्र येऊन राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंद,साखळी उपोषण,आमरण उपोषण सुरु केले आहे.आंदोलनाचा भडका दिवसेंदिवस वाढतच आहे.संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आंदोलक राजकीय नेत्यांचा रस्ता रोकत असल्याने सर्वपक्षीय पुढाऱ्यांची चांगलीच गोची होत आहे.
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी निर्वाणीचा इशारा देत उपोषण सुरू केल्यानंतर राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यातून राजकारण्यांना गावबंदीचे निर्णय झाले आहेत.नेत्यांच्या गाड्या अडविणे, बैठकीत येण्यापासून प्रतिबंध करणे अशा घटना घडत आहेत.मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या लढ्याला मराठा समाजाकडून मोठा पाठिंबा मिळत आहे.(‘अधोरेखित’चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आमदार,खासदार नेते व पुढारी यांना गावबंदी करतानाच विनाकारण आमच्या गावात येऊन अपमान करून घेऊ नये,असे फलक राज्यात अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत.गावांच्या प्रवेशद्वारावर फलक लावून नेत्यांना गावबंदी केल्याने व आक्रमक भूमिका घेतल्याने आरक्षणाचे आंदोलन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.गावबंदीच्या फलकामुळे लोकप्रतिनिधींची कोंडी होणार आहे.राजकीय नेत्यांना गावबंदीचे लोण राज्यभर पसरले आहे.
मराठा समाजबांधवांकडून विशेष सभांचे आयोजन
राज्यात अनेक ठिकाणी मराठा समाजबांधवांकडून विशेष ग्रामसभेचे आयोजन करून या सभांतून नेत्यांना गावबंदी,मराठा आरक्षण आंदोलनाला पाठींबा दिला जात आहे.यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहत आहेत.मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी करण्याचाही ठराव केले जात आहेत.जातनिहाय जनगणना व्हावी,अंतरवाली सराटी आंदोलनात सहभागी मराठा कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत,राज्यातील 48 खासदारांनी आरक्षणासाठी केंद्राकडे मागणी करावी यांसह अन्य निर्णय ग्रामसभांमध्ये घेण्यात येत आहेत.
राज्यातील काही गावांनी आगामी सर्व निवडणुकांवरही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.सांगली जिल्ह्यातील बोरगाव येथे तर कोणत्याही राजकीय नेत्यांचे बॅनर लावण्यात येणार नाहीत.गावातील सर्व मराठाबांधवांनी एकत्र येऊन हा ठराव केला आहे.राजकीय नेते मंडळीबाबत सकल मराठा समाजामध्ये उद्रेकाची भावना निर्माण झाली आहे.राज्यातील अनेक गावांमध्ये लावण्यात आलेल्या फलकांवर मराठा आरक्षण मिळेपर्यंत आगामी काळातील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याची टीपही लिहिली आहे.
‘चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचं लक्ष’
‘चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष,मराठा आरक्षण एकच आमचं लक्ष्य’ मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्ष आणि नेत्यास गावात प्रवेश नाही.त्यामुळे आपली मान मर्यादा राखून गावात प्रवेश करावा.तसेच,कोणत्याही राजकीय पक्षाचे गावात बॅनर लावू नये,असा मजकूर असलेले भलेमोठे फलक मुख्य चाैकाचाैकात लावले आहेत.ते लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.याचा राजकारणी मंडळींनी चांगलाच धसका घेतला आहे.
राज्यात ठीकठिकाणी मुस्लिम बांधवांचाही पाठिंबा
मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यात राज्यभरातून पाठिंबा वाढत आहे.राज्यात अनेक ठिकाणी या आंदोलनाला मुस्लिम बांधवांनीही पाठिंबा दिला आहे.लातूर जिल्ह्यातील जाऊ या गावात 95 टक्के घरे ही मुस्लिम समाजाची आहेत तर 5 टक्के घरे ही दलित समाजाची आहेत.या गावात मराठा समाजाचे एकही घर नाही.पण,तरीही त्या गावाने राजकीय नेत्यांना गावाबंदी केली आहे.मराठा समाजातील गरिब आणि अर्थिकदृष्ट्या दूर्बल तरूणांना शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण मिळणे गरजेचे असून यासाठी चाललेले हे आंदोलनाला आपलाही हातभार असला पाहीजे या व्यापक विचारातून जाऊ या गावातील नागरिकांनी एकत्र येत हा निर्णय घेतला आहे.
पंढरपूर तालुक्यातील 45 गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी
पंढरपूर तालुक्यातील 45 गावामध्येही राजकीय पुढार्यांना गाव बंदी करण्यात आली आहे.पंढरपूर तालुक्यातील 45 गावामध्ये पुढाऱ्यांना गावबंदीचे फलक लावण्यात आले आहेत. सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात येत नसल्याने मराठा समाज आता दिवसेंदिवस आक्रमक होत आहे. आरक्षणासाठी मराठा बांधव एकवटला असून आरक्षण न मिळाल्यास तालुक्यातील 102 गावांमध्ये गाव बंदीचे फलक लावले जातील. तसेच राजकीय नेते आणि आमदारांना श्री विठ्लाचे दर्शन घेवू देणार नाही, असा पवित्रा मराठा समाजाने घेतला आहे. तर लवकरच तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही मराठा बांधवांनी दिला आहे.












































































