Last Updated on 28 Jan 2024 6:59 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पाटणा । बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. या टर्ममध्ये तिस-यांदा त्यांनी शपथ घेतली आहे. यावेळी भाजपचे सम्राट चौधरी व विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्रपदाची शपथ घेतली. हे नेते शपथ घेत असतांना जय श्रीरामाच्या घोषणा देण्यात आल्या. त्यांच्याबरोबर आठ मंत्र्यांनी शपथ घेतली.
पाटणा येथील राजभवनात बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी नितीश कुमार यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी भाजपच्या सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा या दोन नेत्यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.या सोहळयाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि भाजप नेते विनोद तावडे उपस्थितीत होते.
आज सकाळीच नितीश कुमार यांनी बिहारच्या राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.यानंतर त्यांनी संयुक्त जनता दल आणि एनडीए मिळून 128 आमदारांच्या पाठिंब्याने पुन्हा सरकार स्थापन करण्याचा दावा केला.
नितीश कुमार यांनी राजदशी असलेली आपली युती तोडली असून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.गेल्या दोन वर्षांपासून महाआघाडीच्या रुपात संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल (राजद), काँग्रेस आणि डावे सत्तेत होते. मात्र, नितीश कुमार यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे बिहारमधील सरकार आपोआपच बरखास्त झाले. तद्नंतर भाजपाने नितीश कुमार यांना पाठिंबा दिला.हा पाठिंबा मिळताच नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला.
यामुळे सोडली राष्ट्रीय जनता दलाची साथ
नितीश कुमार यांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर, ही वेळ का आली? महाआघाडी तोडण्याचा निर्णय का घेतला असे विचारले असता,’दीड वर्षापूर्वी महाआघाडीत आलो. पण येथेही परिस्थिती चांगली दिसत नव्हती’,असे ते म्हणाले.”सबकी राय आ रही थी, पार्टी की राय थी चारों तरफ से कहा जा रहा था जिसके बाद हमने ये फैसला लिया”,असे नितीश यांनी सांगितले होते.
बिहारमधील संख्याबळ
आरजेडी – 79
भाजप – 78
जेडीयू – 45
काँग्रेस – 19
CPI(ML)L – 12
हम – 4
CPI -2
CPIM – 2
अपक्ष,इतर – 1
MIM – 1
————-
एकूण – 243







































































