Last Updated on 08 Jun 2024 6:08 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाच्या उद्या होणाऱ्या शपथविधीसाठी शेजारील देशांचे आणि हिंद महासागर क्षेत्रातील राष्ट्रांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद मोईज्जू, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफीफ आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंदकुमार जगन्नाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड आणि भूतानचे पंतप्रधान शेरींग टोबगे हे सुद्धा समारंभात सहभागी होणार आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी उद्या संध्याकाळी आयोजित केलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमात देखील हे मान्यवर सहभागी होतील. शेजारी प्रथम हे भारतीय धोरण आणि सागर ध्येय दृष्टी या भारताच्या प्राथमिकतेनुसार या मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलं आहे. शपथविधीसाठी सुमारे ८ हजार मान्यवरांना निमंत्रित केल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं.
शुक्रवारी एनडीएच्या (NDA)संसदीय पक्षाच्या नेतेपदी मोदी यांची निवड करण्यात आली. त्यानंतर मोदी यांनी राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू यांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर राष्ट्रपतींना रविवारी त्यांना सरकार स्थापनेचं निमंत्रण दिलं. शपथग्रहण सोहळ्याला अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित राहाणार आहेत. यासाठी दिल्लीत सुरक्षेचा कडकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिल्लीत नो फ्लाईग झोन घोषित करण्यात आला आहे. राष्ट्रपती भवनची सुरक्षाही व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे.










































































