Last Updated on 13 Mar 2025 4:27 PM by Sanjay Patil/Adhorekhit
शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याचे संपवले जीवन; होळीच्या दिवशी बुलढाण्यात शोककळा
काळीज पिळवटून टाकणारी सुसाईड नोट!
बुलढाणा : जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील प्रगतीशील आणि राज्य पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी कैलास अर्जुन नागरे यांनी आज सकाळी आत्महत्या केली आहे. आपल्या शेतात विषारी औषध घेऊन त्यांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. कैलास नागरे या युवा शेतकऱ्यांने अनेक दिवसांपासून देऊळगाव रागा परिसरातील शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळावे यासाठी लढा सुरू केला होता. मात्र मागणी पूर्ण न झाल्याने नागरे यांनी आत्महत्या केली आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चार पानी सुसाईड नोटही लिहून ठेवल्याची माहिती शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली. कैलास नागरे यांना नुकताच राज्य शासनाचा युवा प्रगतशील शेतकरी पुरस्कार देण्यात आला होता. तसेचते परिसरातील लोकांना आधुनिक शेती करण्याचे प्रशिक्षण देत होते.
नागरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली सुसाइड नोट सापडली असून जिल्हा प्रशासनाने दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही, त्यामुळेच शासनाच्या धोरणाला वैतागून आत्महत्या करत असल्याचे कैलास नागरे यांनी म्हटले आहे.पंचक्रोशीतील शेतीला कायमस्वरूपी पाणी मिळावे, यासाठी कैलास नागरे यांनी डिसेंबर महिन्यात ७ दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यावेळी प्रशासनाने आश्वासन दिल्याने कैलास नागरे यांनी उपोषण सोडले होते. मात्र आश्वासनांची पूर्तता न केल्याने २६ जानेवारी रोजी पुन्हा एकदा आंदोलन करण्याची भूमिका कैलास नागरे यांनी घेतली होती. मात्र त्यावेळी पालकमंत्र्यांनी आश्वासन दिल्याने कैलास नागरे यांनी उपोषण स्थगित केले होते. मात्र दोन महिने उलटूनही शासनाने कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने शेकडो शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी संघर्ष करणारे कैलास नागरे यांनी विषारी औषध प्राशन करून जीवन संपवले.
नागरे यांनी तब्बल चार पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. त्यात विविध मुद्ध्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, आमच्याकडे सिंचनाच्या सर्व सुविधा, पण पाणी नाही; खडकपूर्णा धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली आहे. माझ्यावर केळी, पपईच्या शेतात अंत्यसंस्कार करा; राख आनंदस्वामी धरणात टाका; रक्षा विसर्जनाच्या दिवशी सर्व विधी उरका, असेही त्यात नमूद आहे. सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी माझ्या मुलांचे पालकत्व स्वीकारावे, असे आर्त आवाहन त्यांनी केले आहे. मुलांचे शिक्षण करण्यासाठी मी असमर्थ ठरलो, स्वतः शून्य झालो अन् मुलं, बाबा, बायको यांनाही शून्य करूनच जातोय, असे लिहित त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, खासदारांनाही आवाहन केले आहे.
‘मी शून्य झालो..’
कैलास नागरे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलंय की, “आमच्याकडे सिंचनाच्या सर्व सुविधा आहेत. परंतु तरीही पाणी येत नाही. माझ्यावर आता केळी आणि पपईच्या शेतात अंत्यसंस्कार करा व राख आनंदस्वामी धरणात टाका. मुख्यमंत्र्यांनी माझ्या मुलांचे पालकत्व स्वीकारावं. माझ्या मुलांचे शिक्षण करण्यासाठी मी असमर्थ ठरलो… स्वतः शून्य झालो.”










































































