Last Updated on 13 Dec 2023 7:40 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । सांगलीच्या दत्त इंडियाने सोमवारी रात्री दराची कोंडी फोडली.त्यानंतर आज शिराळा येथील दालमिया कारखान्यानेही (निनाईदेवी) ऊस दराची कोंडी फोडत ऊस दर जाहीर केला.’स्वाभिमानी’च्या आंदोलनाला यश मिळाले आहे.दालमिया कारखान्याने 3 हजार 134 अधिक 100 रुपये एवढी एकरकमी एफ्आरपी 3234 देण्याचे मान्य केले आहे.त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी दि. 16 डिसेंबर 2023 रोजी बोलविलेल्या बैठकीमध्ये सकारात्मक विचार होईल व सदर बैठकीमध्ये होणारा निर्णय आम्हास मान्य राहील असे दालमिया दालमिया शुगरचे युनिट हेड संतोष कुंभार यांनी म्हटले आहे.दरम्यान,जिल्ह्यातील उर्वरित साखर कारखान्यांच्या भूमिकेकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
माजी खा. राजू शेट्टी यांनी सोमवारी रात्री दालमिया शुगरचा काटा बंद आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आले होते.आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दालमिया शुगर कारखान्यावर कांटा बंद आंदोलन सुरू केले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी कारखाना तीन तास बंद पाडला.पोलिस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची झटपट झाली.काटा बंद आंदोलनामुळे राजु शेट्टी यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्यानंतर दालमिया दालमिया शुगरचे युनिट हेड संतोष कुंभार यांनी एकरकमी 3134 अधिक 100 तसेच गतवर्षी तुटलेल्या ऊसाला 50 रूपये प्रमाणे देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात मान्य केले आहे.
दालमिया दालमिया शुगरचे युनिट हेड संतोष कुंभार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,करुंगली-आरळा या कारखान्याचा गळीत हंगाम सन 2023-2024 सुरु झाला असून आम्ही दि. 5 डिसेंबर 2023 पर्यंत झालेल्या ऊस गळीताचे प्रति टन रु. 3100/- या प्रमाणे रक्कम शेतक-याच्या खातेवर वर्ग केलेले आहेत.आमच्या कारखान्याचे मागील वर्षीचे साखर उता-यानुसार प्रति टन रुपये 3128/- (एफ.आर.पी.) प्रमाणे होत आहे.
आमचे कारखान्याकडे को-जनरेशन आणि डिस्टीलिरी प्रकल्प अस्तित्वात नाही तसेच कारखाना दुर्गम भागात असलेमुळे वाहतुकीचा खर्च इतर कारखान्यापेक्षा जादाचा राहतो. त्यामुळे ऊसाला एफ.आर.पी. अधिक दर देणे आर्थिक दृष्टया शक्य होत नाही.तरी देखील यावर्षीची ऊसाची कमतरता पाहता व इतर जिल्हातून अतिरिक्त ऊस दराची स्पर्धा चालु असलेचे दिसून येते.सध्याची ऊस दराची स्पर्धा पाहता कारखान्यासाठी पुरेसा ऊस उपलब्ध होणेकरिता आमचे कारखान्याच्या शेती विभागाकडून आपणासही अतिरिक्त इतर कारखान्याप्रमाणे उचल द्यावी लागणार आहे अशी मागणी केलेली आहे.
दरम्यानच्या काळात आमचे कारखान्यासमोर आज दि. 12-12-2023 रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. मा. राजू शेट्टी साहेब व त्यांचे कार्यकर्ते काटा बंद आंदोलनास बसणार आहेत त्यांची प्रमुख मागणी यावर्षीची पहिली उचल एफ.आर.पी अधिक शंभर अशी आहे.त्यांच्या या मागणीचा विचार करुन ते देणेस आम्ही कटिबध्द आहोत.त्याचप्रमाणे मागील वर्षीच्या हंगामास रुपये 3000/- च्या वरील रुपये 50/- प्रति मे.टन अशी मागणी असून त्याबाबतचा प्रस्ताव लवकरच शासनाकडे मंजुरीकरीता पाठवत आहोत.त्याअनुषंगाने मा. जिल्हाधिकारीसाहेब यांनी दि. 16-12-2023 रोजी बोलविलेल्या बैठकीमध्ये सकारात्मक विचार होईल व सदर बैठकीमध्ये होणारा निर्णय आम्हास मान्य राहील.

आजच्या आंदोलनात तालुकाध्यक्ष भागवत जाधव,शिराळा तालुकाध्यक्ष देवेंद्र धस,मानसिंगराव पाटील,रविंद्र पाटील,शिवलिंग शेटे,प्रकाश पाटील,चंद्रकांत पाटील,शाहुवाडी तालुका अध्यक्ष सुरेश म्हामुटकर,सातारा जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील,विजयकुमार थोरात,मनिष पाटील,अरविंद पाटील,शिवाजी पाटील,गुरुनाथ शिंदे,जयसिंग पाटील,चंद्रकांत पाटील,दादासो पाटील,अजित साळुंखे,गुरुनाथ शिंदे, शामराव पाटील,राजू पाटील,नामदेव कांबळे,भिमाशंकर कांबळे,बाळासाहेब कांबळे,सह कार्यकर्ते उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा – अखेर दत्त इंडिया कारखान्याने ऊस दराची कोंडी फोडली
अन्यथा आंदोलनाचा भडका उडेल…
सांगली जिल्ह्यातील दत्त व दालमिया शुगर या खासगी साखर कारखान्यांनी ऊसदराची कोंडी फोडली.पण,सहकारी साखर कारखाने मुग गिळून गप्प बसले आहेत.जे दर देतात त्यांना दर देऊ नका हा कसला पुरुषार्थ आहे.शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे मिळाले पाहिजेत अन्यथा आंदोलनाचा भडका उडेल.
भागवत जाधव
स्वाभिमानी शेतकरी संघटना








































































