Last Updated on 01 Feb 2022 7:14 PM by Sanjay Patil/Adhorekhit
इस्लामपूर येथील श्रीमती शकुंतला शंकरराव पाटील (वय ९२) यांचे सोमवारी निधन झाले.त्यानिमित्त…
जन्माला आल्यापासून काल अखेर आम्हा कुटूंबियांची संरक्षक ढाल म्हणून वावरणारी आमची थोरली ताई मावशी काल गेली.माझी आई व दुसरी मावशी सौ.नंदा यांची ती सर्वकालीन मार्गदर्शक होती.
मध्यमवर्गीय कुटूंबातल्या प्रमुख स्त्रीचा चेहरा कुटूंबाची ख्याली खुशाली सांगतो. 92 वर्षे हा हसतमुख चेहरा हसत हसत साऱ्या संकटाना सामोरा गेला. अल्प शिक्षित असली तरी वकील साहेबांची बायको असल्यामुळे ती गल्लीची ‘वकीलीण बाई’ झाली.स्वतःची सहा मुले,आम्ही चौघे, शेणे गावातील आत्याची मुले अश्या अख्या क्रिकेट टीमची ती आमच्या बालपणी कर्णधार होती.
संभुआप्पा उरुसात आमच्या लहानपणी आम्हा सर्वांचे संचलन तिच्या मार्गदर्शनाखालीच होत असे. मी अकरावीला तिच्या घरीच जेवायला होतो.किंबहुना साऱ्याच पाहुण्यांची पोरं पकडून आणून त्यांना शिकवण्याची तिला प्रचंड हौस होती. काटकसर, बचत आणि हसतमुख चेहऱ्यानं संसाराचा गाढा ओढताना ती कधी थकली नाही. आपण आणि आपल्या दोन्ही बहिणींचे नातवंडांपर्यंतचे संसार तिनं उभे केले.जगण्याची लढाई पुढे उभा राहून लीड करण्याचा तिचा स्वभाव होता.घरी आलेला एकही माणूस काही तरी खाल्या पिल्याशिवाय तीच्या घरातून बाहेर पडल्याचे एकही उदाहरण नाही.लग्न,मृत्यू,बाळंतपण,वाढदिवस,उत्सव अश्या सर्व ठिकाणी तिचं व्यवस्थापन कौशल्य एम.बी.ए. पदवीधरांना लाजवील असं होतं.
स्मरणशक्ती प्रचंड.नातवंड,परतवंड यांची नांव तोंडपाठ! कोण काय करतय याचे तपशील मुखोदगत.ताई मावशी म्हणजे जिव्हाळा आणि जिव्हाळा म्हणजे ताई मावशी हे समीकरणच होते.आम्हाला वाढदिवसाला बक्षीस द्यायची.मला तर 61 व्या वाढदिवसाला या मावशीने घरी बोलवून शंभर रुपये बक्षीस दिले.आत्तापर्यंत मला मिळालेल्या पुरस्कारात हा 100 रुपयांचा पुरस्कार अमूल्य आहे.माझी आई नसल्यामुळे तिनं माय मरो, मावशी जगो ही उक्ती सार्थ केली.आयुष्यभर माणसं जोडत राहिली.उरुणातले गावधनी,संपतराव पाटील यांच्या पत्नी,श्रीमती निर्मला त्यांना आम्ही संपत काकी म्हणतो.माझ्या मावशीच्या जिवा भावाच्या मैत्रीण.मावशी गेल्यावर गावची ही धनीण सैरभैर झाली.पाटीलकीचे सगळे संकेत मोडून मैत्रिणीला अखेरचा निरोप देण्यासाठी स्मशान भूमीपर्यंत धावत आली.ताई मावशीचे अखेरचे दिवस सुसहय व्हावेत म्हणून अनिल,संजय ही मुले,अनुराधा,वर्षा या सुना कमल,भारती,सरोज,शोभा या मुली आणि नातवंडे भरपूर धडपडली.काल दिवसभर स्मशानभूमी परिसरात वावरताना मी आणलेले उसने अवसान रात्री गळून पडले.माझी आई,मावशीच्या आठवणीने जीव व्याकुळ झाला.अश्रूंचा बांध फुटला.
मृत्यूनंतर माणसाचं काय होतं? मला माहित नाही.पण माझी मावशी आईला भेटली तर सांगणार,’बाई तू काळजी करू नको आपली पोरं सुखात आहेत,राहतील.आपली नंदा शंभर वर्षे जगेल.मीच तर तसा आशीर्वाद देऊन आले इकडे.’ सार्वजनिक जीवनात कुठलंही महत्वाचं पद नसणाऱ्या पण वाघिणी सारखं आपलं घर आणि जिव्हाळा जपणाऱ्या अशा माझ्या ‘ताई मावशी’ सारख्या मावशी घरोघरी आहेत.ताई मावशीच्या माध्यमातून या सगळ्याच मावश्यांना अंत:करणपूर्वक सलाम !
प्रा.डॉ.संजय थोरात
इस्लामपूर







































































