Last Updated on 05 Nov 2024 7:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अमेरिकेत आज अध्यक्षीय निवडणुकीसाठी मतदान
US Presidential Election 2024 : अमेरिकेच्या ४७व्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्या कमला हॅरिस यांच्यात लढत होत आहे. मतदानाला सुरूवात झाली आहे; तर उद्या सकाळी साडेसात ते साडे नऊ यावेळेत ते संपेल.
या दोघांनीही निवडणुकीत निर्णायक ठरणाऱ्या राज्यांमध्ये जोरदार प्रचार केला आहे. टपाली मतदानाने अनेकांनी आपलं मत आधीच नोंदवलं आहे. या निवडणुकीची मतमोजणी ६ जानेवारीला अमेरिकेच्या संयुक्त संसद अधिवेशनात होणार असून, तेव्हाच विजयी उमेदवाराची घोषणा करण्यात येईल. अमेरिकेच्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षाचा कार्यकाळ २० जानेवारीपासून सुरू होत असून तो चार वर्षाचा असेल.
अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी मतदानाला झाली सुरूवात
दरम्यान,अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या, कमला हॅरीस आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अध्यक्ष पदासाठी अत्यंत चुरशीची लढत सुरू आहे. बुधवारी सकाळी साडे सहा वाजेपर्यंत मतदान चालेल. आणि त्यानंतर निकाल येण्यासही सुरूवात होईल. कमला हॅरिस सध्या अमेरीकेच्या उपराष्ट्रपती आहेत तर डोनाल्ड ट्रम्प यांनी, २०१७ ते २०२१ या काळात राष्ट्रपती पद भूषवलं आहे. अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण, हवामानबदल, यासारखे मुद्दे निवडणुकीसाठी महत्वाचे ठरणार आहेत. त्याशिवाय, महिला मतदारांचा कमला हैरीस यांना ,तर पुरुष मतदारांचा डोनॉल्ड ट्रम्प यांना पाठिंबा आहे. त्यामुळे यंदा, कोणाची मतं निर्णायक ठरतात, त्यावर अध्यक्षांची निवड अवलंबून आहे.
साभार : प्रसार भारती










































































