Last Updated on 01 Dec 2022 10:18 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर | ग्रामीण पातळीवर बोगस डॉक्टरांना आळा घालण्याविषयी विशेष भर द्यावा. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर नवीन खासगी दवाखाना अथवा नवीन खासगी वैद्यकीय व्यवसाय सुरु करताना यापुढे संबंधित वैद्यकीय व्यावसायिक तथा खासगी डॉक्टर यांचे पदवी प्रमाणपत्र व नोंदणी प्रमाणपत्र यांची संबंधित ग्रामसेवक तथा स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन यांनी संलग्न स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मदतीने पडताळणी करुन प्रमाणपत्रे ग्राह्य असल्याची खात्री केल्यानंतरच नवीन दवाखाना अथवा खासगी वैद्यकीय व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरीय बोगस डॉक्टर चौकशी समितीची सभा नुकतीच पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस सदस्य सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक प्रतिनिधी ॲड. गौरी पाटील, तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा परिषद मुख्यालय दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातून प्राप्त एकूण 17 बोगस डॉक्टरविषयक तक्रारींचा आढावा घेण्यात आला. यावेळी दोषी बोगस डॉक्टरांवर केलेल्या कारवाईबाबत जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी समाधान व्यक्त केले. यापुढे बोगस डॉक्टर शोध मोहीम आणखी तीव्र करुन अधिकाधिक बोगस डॉक्टरांचा शोध घेवून त्यांच्यावर तात्काळ आणि गंभीर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना त्यांनी सर्व समिती सदस्यांना केल्या.
सध्या कार्यरत असणाऱ्या खासगी वैद्यकीय व्यावसायिक तथा खासगी डॉक्टरांच्या पदवी प्रमाणपत्र व नोंदणी प्रमाणपत्र यांची पडताळणी करुन अहवाल गटविकास अधिकारी तथा अध्यक्ष तालुकास्तरीय बोगस डॉक्टर चौकशी समिती, पंचायत समिती यांनी जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर चौकशी समितीला 15 दिवसात सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रेखावर यांनी दिले.










































































