Last Updated on 04 Feb 2025 8:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
जिल्हाधिकारी अमोल येडगे : तालुकास्तरीय प्रशासनाला व्हिसीद्वारे सूचना
कोल्हापूर । कॉपीमुक्त अभियानांतर्गत परीक्षा केंद्रावर स्वतः गैरप्रकार करणाऱ्या कर्मचारी तसेच इतर व्यक्तींवर गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान १०० टक्के यशस्वी राबविण्यात येणार असून प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे तपासणी पथक असेल तसेच फिरते भरारी पथक परिणामकारक तपासणी करेल, अशा सूचना तालुकास्तरीय प्रशासनाला व्हिसीद्वारे आयोजित बैठकीत त्यांनी केल्या. इयत्ता दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेत कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्याबाबत झालेल्या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, प्रत्येक परीक्षा केंद्राचा नकाशा तयार करून सुरक्षेबाबत, कॉपी करण्यासाठी असलेले छुपे मार्ग, तेथील शांतता याबाबत सविस्तर माहिती घ्या. त्यासाठी आवश्यक उपाययोजना आखून आवश्यक कामेही पूर्ण करा. संवेदनशील व अति संवेदनशील परीक्षा केंद्रांवर अधिक लक्ष ठेवा. तसेच अशा केंद्रांना भरारी पथकांनी वारंवार भेट द्याव्यात. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुका दक्षता समिती असून त्यांनी वर्ग १ व २ अधिकारी नियुक्त करून भरारी पथक नेमावे. तसेच त्यांना प्रशिक्षण देऊन सर्व सूचना द्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी भरारी पथकातील कर्मचारी आणि संबंधित अधिकारी यांनी रँडम पद्धतीने भेटी देऊन पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. तालुका मुख्यालयापासून दूर असलेल्या केंद्रांवर विशेष लक्ष ठेवून तपासणी करा. गैरप्रकार रोखण्यासाठी त्यामध्ये सहभागींवर कारवाई करावी. केंद्राजवळील सर्व झेरॉक्स दुकाने त्या काळात बंद राहतील याची काळजी घ्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.














































































