Last Updated on 18 Jul 2025 7:33 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राज्यातील उस्मानाबाद, अहमदनगर आणि औरंगाबाद या जिल्ह्यांची नावे बदलल्यानंतर आता सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचेही नाव बदलण्यात आले आहे. इस्लामपूरचे नाव आता ‘ईश्वरपूर’ असे करण्यात आले आहे. इस्लामपूर या शहराचे नाव बदलून ईश्वरपूर करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत असून जनभावना लक्षात घेता इस्लामपूर या शहराचे नाव ‘ईश्वरपूर’ असे करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला राज्य शासनाच्या शिफारशीसह सादर करण्यास मान्यता देण्यात आली.
आजचा दिवस वाळवा तालुक्यासाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक ठरला आहे. इस्लामपूर शहराचे नामांतर ‘ईश्वरपूर’ असे करण्यात आले. ही मागणी अनेक वर्षांपासून वाळवा तालुक्यातील जनतेची होती. शहराच्या नावात बदल व्हावा, ही लोकांची श्रद्धेची आणि संस्कृतिक भावनेशी जोडलेली अपेक्षा होती. या मागणीसाठी अनेक लोकांनी अथक परिश्रम घेतले आणि सातत्याने पाठपुरावा केला.
हे साकडं आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मांडल्यानंतर ते त्याला नक्की न्याय देतील खात्री आमदार सदाभाऊ खोत यांनी सभागृहात व्यक्त केली होती आणि आज ‘इस्लामपूर’ चे ‘ईश्वरपूर’ असे नामकरण जाहीर करून ईश्वरपूर नगरीतील जनतेच्या भावना त्यांनी पूर्ण केली आहे.

या निर्णयाचे आमदार सदाभाऊ खोत यांनी स्वागत केले आहे. इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करण्याची मागणी गेल्या काही काळापासून स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून केली जात होती. विशेषत: वाळवा तालुक्यातील नागरिकांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. सदाभाऊ खोत यांनी सांगितले, “ईश्वरपूर नावाचा प्रस्ताव आम्ही मांडला होता. स्थानिक जनतेच्या भावना लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे. याबद्दल मी ईश्वरपूरच्या नागरिकांचे अभिनंदन करतो.”


या ऐतिहासिक निर्णयामुळे वाळवा तालुक्यातील सर्व नागरिकांमध्ये उत्साहाचे आणि समाधानाचे वातावरण आहे. इस्लामपूर शहरात शिवसेनेसह हिंदुत्ववादी संघटनांनी फटाक्यांची आतषबाजी करत व पेढे वाटून जल्लोष केला. त्याचबरोबर राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी च्या वतीने ईश्वरपूर निर्णयाचे जोरदार स्वागत, फटाक्याची आताषबाजी व महायुती सरकारच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.
दरम्यान, सन १९८६ साली शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची इस्लामपुरात जाहीर सभा झाली होती. या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी इस्लामपूरचे ईश्वरपूर नामकरण व्हावे, अशी घोषणा केली होती. तेव्हापासून शहराच्या नामांतरणाचा प्रश्न चर्चेत होता. शिवसेना, शिवप्रतिष्ठान यासह हिंदुत्ववादी संघटनांनी नामांतरणासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. इस्लामपूर नगरपालिकेत विकास आघाडीची सत्ता असताना नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या १८ डिसेंबर २०२१ च्या शेवटच्या मासिक सभेत ईश्वरपूर नामांतरणाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. सन २०१४ साली नामकरण समितीही स्थापन करण्यात आली होती. शिवप्रतिष्ठानचे बाळासाहेब गायकवाड, गजानन पाटील यांनीही सातत्याने यासाठी पाठपुरावा चालू ठेवला होता. शुक्रवारी विधानसभेत व विधान परिषदेत मंत्री चंद्रकांत पाटील व छगन भुजबळ यांनी लोक भावनेचा आदर करत इस्लामपूरचे ईश्वरपूर नामांतरण करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात येत असल्याची घोषणा केली. तसेच हा विषय केंद्राच्या अखऱ्यातीत येत असल्याने हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी लवकरच केंद्राकडे पाठवण्यात येत असल्याचे सांगितले.
निशिकांत भोसले – पाटील यांनी महायुती सरकार चे मानले आभार
माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष, राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले – पाटील म्हणाले, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगली जिल्ह्यातील ‘इस्लामपूर’ शहराचे नाव बदलण्याबाबत घोषणा केली. इस्लामपूर शहराचे नाव आता ईश्वरपूर असे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याची माहिती दिली. आता प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, मी नगराध्यक्ष असताना ईश्वरपूरच्या मागणीसाठी आंदोलन केले होते.आमदार सदाभाऊ खोत यांनी विधिमंडळात देखील ईश्वरपूरच्या नामकरणाची मागणी केली होती.ईश्वरपूर नगरीच्या सर्व नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे, आमदार सदाभाऊ खोत यांचे या निर्णयाबद्दल स्वागत करून महायुती सरकार चे आभार व्यक्त करतो.










































































