Last Updated on 16 May 2022 3:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुलांच्या राजस्थान व मुलींच्या केरळ संघास रौप्यपदक
इस्लामपूर येथील राष्ट्रीय व्हॉलिबॉल स्पर्धेसाठी क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सांगली ।
इस्लामपूर येथील लोकनेते राजारामबापू पाटील क्रीडा नगरीत आयोजित २४ व्या युवा राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलांच्या दिल्ली संघाने सुवर्णपदक,तर राजस्थान संघाने रौप्यपदक,तसेच मुलींच्या गुजरात संघाने सुवर्णपदक,आणि केरळ संघाने रौप्यपदक पटकाविले.जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील,सौ.शैलजादेवी पाटील,महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील,युवक राष्ट्रवादीचे राजाध्यक्ष मेहबूब शेख,भारतीय व्हॉलीबॉल फेडरेशनचे महासचिव अनिल चौधरी,बाळासाहेब सुर्यवंशी,नीलकंठ बशीर यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
याप्रसंगी राज्याचे सहकार व कृषी राज्य मंत्री ना.विश्वजित कदम,क्रीडा राज्यमंत्री ना.आदिती तटकरे,नगर विकास राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे,माजी मंत्री आण्णासाहेब डांगे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी ‘प्रतिसाद’ स्मरणिका प्रकाशन आणि जेष्ठ संघटक,खेळाडू एम.एस. सुर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आले. साधारण १५ ते २० हजारच्यावर क्रीडा रसिकांनी या दोन्ही अंतिम सामन्याचा मनमुराद आनंद लुटला.

प्रथम मुलींच्या गुजरात विरुध्द केरळ या संघातील अंतिम सामना खेळविण्यात आला. गुजरात संघाने सलग ३ सेट घेत सुवर्ण पदकावर नांव कोरले. त्यांनी पहिल्यापासून सामन्यावर पकड ठेवत पहिला सेट २५-२१ ने,दुसरा सेट २५-१९ ने,तर तिसरा सेटही २५-१९ जिंकला. या संघातील मुलींनी सांघिक खेळाचे प्रदर्शन केले. गुजरात संघाने विजयश्री खेचून आणल्यावर मैदानातच गरबा केला. मुलींच्या हरियाणा संघाने तिसरा क्रमांक मिळविला आहे.
मुलांच्या दिल्ली संघाने पहिल्यापासून प्रभावी आक्रमण व उत्कृष्ठ बचावाचा खेळ करीत राजस्थान संघावर थेट विजय मिळविला. दिल्ली संघाने पहिला सेट २५-२१, दुसरा सेट २५- १५,तर तिसरा सेट २५-२० फरकाने जिंकून विजयश्री खेचून आणला. दिल्लीवालोने खऱ्या अर्थाने क्रीडा रसिकांचे दिल जित लिया. मुलांच्या पंजाब संघाने तिसरा क्रमांक पटकाविला आहे.
यावेळी ना.कदम म्हणाले,जिल्ह्याच्या इतिहासात अशी स्पर्धा झाली नाही. पुन्हा घ्यायची असेल,तर ती प्रतिकदादाच घेतील. या स्पर्धेची देशातील टॉप स्पर्धा म्हणून नोंद होईल.
ना.तटकरे म्हणाले,मला राज्याची क्रीडा राज्यमंत्री म्हणून ही स्पर्धा पाहताना मनस्वी आनंद होत आहे. आम्हीही कबड्डी,कुस्ती, शरीर सौष्ठवसारख्या स्पर्धांच्या आयोजनाने सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली आहे. पुन्हा जेंव्हा राज्यात व्हॉलीबॉलची राष्ट्रीय स्पर्धा होईल,तेंव्हा अंतिम फेरीत महाराष्ट्राचा संघही असेल,ही अपेक्षा आहे.
ना.तनपुरे म्हणाले,स्व.बापू व ना.जयंतराव पाटील यांनी हा तालुका घडविताना जिवा भावाची माणसे जपली. तीच परंपरा प्रतिक दादा पाटीलही जपतील. देशातील उत्कृष्ठ स्पर्धा घेवून देशातील खेळाडूंचा खेळ पहाण्या ची संधी प्रतिकदादा पाटील यांनी उपलब्ध करून दिली आहे. यावेळी भारतीय व्हॉलीबॉलचे नीलकंठ बशीर यांनी प्रतिकदादा पाटील यांनी केलेल्या स्पर्धेच्या नियोजनाचे कौतुक केले.
प्रारंभी प्रतिकदादा पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. साहेबांनी पूर्वीं मोठ- मोठ्या स्पर्धा घेवून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. आपण आयोजित केलेली ही स्पर्धा देशातील सर्वोत्तम स्पर्धा करण्यात सर्व घटकांनी मोलाचे सहकार्य केले असून मी त्या सर्वांचा आभारी आहे. देशातून आलेल्या खेळाडूंनीही खिलाडूवृत्तीने अप्रतिम खेळ केला आहे. यापुढेही जिल्ह्यात,राज्यात खेळाडू घडविण्याचे काम अखंड ठेवू.
याप्रसंगी युवा नेते शरद लाड,प्रा.शामराव पाटील,आर.डी.सावंत,नेताजीराव पाटील, विनायक पाटील,देवराज पाटील,विजयराव पाटील,अँड.चिमण डांगे,अँड.धैर्यशील पाटील,बाळासाहेब पाटील,संजय पाटील, दादासो पाटील,शहाजी पाटील,खंडेराव जाधव,पोपट पाटील (सर) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रा.डॉ.संदीप पाटील यांनी आभार मानले. प्रसाद कुलकर्णी व आरजे अक्षय यांच्या समालोचनाने स्पर्धेची रंगत वाढत गेली.
क्रीडा रसिकांचा उदंड प्रतिसाद व प्रतिकदादांचे उत्कृष्ठ नियोजन
साधारण १५ ते २० हजारच्यावरती क्रीडा रसिकांनी रात्री उशिरापर्यंत या दोन्ही अंतिम सामान्यांचा मनमुराद आनंद लुटला. सर्व गॅलरी क्रीडा रसिकांनी खचाखच भरल्या होत्या. अंतिम सामन्यासाठी एकच मैदान करून रसिकांच्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था केली होती. मुलींचा रात्री ९.१५ ला,तर मुलां चा रात्री ११.१५ ला सामना खेळविला. हा सामना रात्री १२.३० वाजता संपला. उपस्थित क्रीडा रसिक,राज्य व देशातून आलेले खेळाडू,पंच व मान्यवरांनी प्रतिकदादा पाटील यांच्या उत्कृष्ठ नियोजनाचे तोंड भरून कौतुक केले.










































































