Last Updated on 08 Dec 2023 8:03 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मतदार नोंदणी अभियानासाठी महाविद्यालयांबरोबरच विविध स्तरावरून जाणीव जागृती व्हावी : तहसीलदार प्रदीप उबाळे
सांगली । मतदार नोंदणी अभियान या उपक्रमासाठी महाविद्यालयांबरोबरच समाजाच्या विविध स्तरावरून अधिक जाणीव जागृती व्हावी आणि अधिकाधिक मतदार नोंदणी करावी,असे आवाहन तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी केले.
इस्लामपूर येथील वाळवा तालुका शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये आयोजित मतदार नोंदणी अभियान कार्यक्रमात ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए.एम.जाधव उपस्थित होते याप्रसंगी बोलताना तहसीलदार उबाळे यांनी या अभियानचे महत्त्व तसेच एकूणच युवा पिढीची समाजाबद्दल,राष्ट्राबद्दल असणारी जबाबदारी विशद केली.
यावेळी नायब तहसीलदार सीमा सोनवणे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन तसेच ऑफलाइन मतदार नोंदणी करण्याबाबतची प्रक्रिया समजावून देऊन मतदार नोंदणी सुरू केली.
याप्रसंगी वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ. अशोक शिंदे,राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ.गोरखनाथ किर्दत, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अमोल चांदेकर आदी उपस्थित होते.प्रा.पांडुरंग पाटील यांनी आभार मानले.












































































