Last Updated on 28 Oct 2024 7:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार सोहळ्यात वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटी इस्लामपूरच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने तिहेरी यश संपादन केले. महाविद्यालयास विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ठ महाविद्यालय एकक पुरस्कार, या महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. गोरखनाथ किर्दत यांना सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार तसेच स्वयंसेवक श्रेणिक नरेंद्र नांगरे -पाटील यास सांगली जिल्हास्तरीय तृतीय क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार असे ३ पुरस्कार प्राप्त झाले.
विद्यापीठाच्या शाहू सिनेट सभागृहामध्ये झालेल्या या पुरस्कार वितरण कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू, डॉ. डी.टी. शिर्के, प्र कुलगुरू, डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक, डॉ. टी. एम. चौगले आदी मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.एम. जाधव, डॉ.जी. के. किर्दत, श्रेणिक नांगरे पाटील आदींचा यथोचित गौरव करण्यात आला.
यावेळी प्रा. मानसिंग ठोंबरे, प्रा पी. एन. पाटील आदी उपस्थित होते.. प्रा. डॉ.गोरखनाथ किर्दत यांना महाराष्ट्र शासनाचा देखील उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी राज्यस्तरीय प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कार नुकताच जाहीर झाला असून शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार समिती सदस्य पदी ही त्यांची निवड विद्यापीठाकडून करण्यात आली आहे. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे मानद सचिव ऍड.बी.एस. पाटील , सहसचिव एड.धैर्यशील पाटील यांनी डॉ. किर्दत व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.












































































