Last Updated on 08 Oct 2022 7:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
मुंबई । राज्याचा आजचा दिवस (8 ऑक्टोबर) अग्नितांडवाचा दिवस ठरला.दिवसभर एकामागून एक अग्नितांडवाच्या घटना घडल्या.नाशिक येथे खासगी बस जळाली.नाशिकनंतर सप्तशृंगी गडावर बसने अचानक पेट घेतला.मनमाडजवळ गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने सिलेंडरचे एकामागे एक स्फोट झाले.तर,मुंबईत इमारतीला भीषण आग लागली.अग्नितांडवाने राज्याला हादरून सोडले.
लोक झोपेतून जागे होत असतानाच नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात खासगी प्रवासी बस जळून 12 प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झाला तर काही प्रवासी किरकोळ व गंभीर जखमी झाले.औरंगाबाद रस्त्यावरील मिरची हॉटेलच्या सिग्नलजवळ एका खासगी बसला मोठा अपघात झाला असून यात बस पूर्णतः जळून खाक झाली.

दरम्यान, आज दुपारी वणी येथील सप्तशृंगी गडावर एका बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे.वणी मध्ये बर्निंग बसचा थरार, महामंडळाची बस पेटली;प्रवासी बालंबाल बचावले.अचानक बसने पेट घेतल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. बसला आग लागल्यानंतर प्रवाशांनी गाडीतून उड्या मारून आपला जीव वाचवला.सुदैवानं या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.आज दुपारी बारा वाजेच्या दरम्यान श्री सप्तशृंगी गड येथे ग्रामपंचायतच्या टोलनाक्याच्या जवळ महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. एसटी बस पिंपळगाव बसवंत डेपोची होती. प्रसंगावधान राखून चालक आणि वाहक यांनी सर्व 33 प्रवाशांना खाली उतरवले.सर्वांनी प्रसंगावधान राखून वेळीच उपाययोजना योग्य प्रकारे राबविल्याने मोठी दुर्घटना टळली.

मनमाडजवळ पुणे-इंदोर महामार्गावर गॅस सिलेंडर घेऊन ट्रकला अपघात झाला. त्यानंतर लागलेल्या आगीत सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. एकापाठोपाठ स्फोटानंतर सिलेंडर आकाश उडाले.गॅस सिलेंडर घेऊन जाणारा बुलेट ट्रक पलटी होऊन त्यात आग लागल्याची घटना मनमाडपासून जवळ पुणे-इंदौर महामार्गांवर घडली. आग लागल्यानंतर सिलेंडरचे स्फोट होत असल्यामुळे यामार्गांवरील वाहतूक 2 किमी लांब रोखून धरण्यात आली.ट्रकमध्ये गॅसने भरलेले सुमारे 200 सिलेंडर असल्याचे सांगण्यात येत आहे. आग लागल्यामुळे सिलेंडरचा स्फोट झाला. त्यानंतर एकापाठोपाठ काही सिलेंडर आकाशामध्ये उडाले.

एकामागून एक घटना घडत असताना दुपारी मुंबईच्या कुर्ला परिसरतील नवीन टिळक भागात एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागली. या इमारतीच्या काही सदनिकात राहणारे नागरिक जिवाच्या भीतीने खिडकीतून बाहेर पडून तेथील जागेचा त्यांनी आसरा घेतला.त्यांना वाचवण्यासाठी बचाव कार्य सुरू झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

![]()










































































