Last Updated on 25 Mar 2026 7:20 AM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली ।
जिममध्ये घाम गाळण्यापेक्षा किंवा डाएट करण्यापेक्षा ‘औषधं’ घेऊन झटपट बारीक होण्याकडे सध्या तरुणाईचा कल वाढला आहे. मात्र, याच संधीचा फायदा घेत वजन कमी करणाऱ्या औषधांचा (GLP-1) काळाबाजार आणि अनधिकृत जाहिरातींचा सुळसुळाट झाला आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत भारताच्या औषध नियंत्रकांनी (Drug Controller) आता देशभरात मोठी शोधमोहीम सुरू केली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांचे परवाने रद्द करण्याचे संकेत दिले आहेत.
भारतीय बाजारपेठेत अलीकडेच GLP-1 आधारित वजन कमी करणाऱ्या औषधांचे अनेक जेनेरिक प्रकार दाखल झाले आहेत. ऑनलाईन प्लॅटफॉर्म, औषध दुकाने आणि काही स्लिमिंग क्लिनिक्स (Wellness Clinics) डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय या औषधांची विक्री करत असल्याचे समोर आले आहे. मुळात ही औषधे विशिष्ट आजारांसाठी आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच वापरणे बंधनकारक आहे, मात्र ‘ऑफ-लेबल’ वापरामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
औषध नियंत्रकांनी १० मार्च २०२६ रोजी सर्व उत्पादकांना कडक सूचना जारी केल्या आहेत. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून गेल्या काही आठवड्यांत मोठी अंमलबजावणी करण्यात आली आहे.
देशभरातील ४९ संस्थांचे लेखापरीक्षण आणि तपासणी करण्यात आली. यामध्ये ऑनलाईन फार्मसीची गोदामे, घाऊक विक्रेते आणि वेलनेस क्लिनिक्सचा समावेश आहे. अनधिकृत विक्री आणि चुकीच्या पद्धतीने औषधे लिहून देणाऱ्या संस्थांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
तज्ज्ञांचा सल्ला: स्वतःच्या मनाने औषध घेणे टाळा!
नियामक मंडळाने स्पष्ट केले आहे की, वैद्यकीय देखरेखीशिवाय या औषधांचा गैरवापर केल्यास शरीरावर अत्यंत गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. भारतात ही औषधे केवळ खालील तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घेता येतात:
१. अंत:स्त्रावग्रंथी तज्ञ (Endocrinologists)
२. इंटर्नल मेडिसिन तज्ञ
३. विशिष्ट परिस्थितींत ह्रुदयरोग तज्ञ (Cardiologists)
कडक कारवाईचा इशारा : येत्या काही आठवड्यांत ही देखरेख अधिक तीव्र केली जाईल. नियमांचे पालन न केल्यास दंड आकारणे, परवाने रद्द करणे आणि खटला चालवणे अशी कठोर पावले उचलली जाणार आहेत. ‘झटपट निकाला’च्या नावाखाली स्वतःच्या जीवाशी खेळू नका, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.










































































