Last Updated on 30 Dec 2025 3:02 PM by Sanjay Patil/Adhorekhit
येडेनिपाणीत बिबट्याचे दर्शन
सांगली ।
येडेनिपाणी ( वाळवा) येथे शनिवारी सकाळी पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाले. नारळाच्या झाडावरून बिबट्या खाली उतरताना लोकांना दिसला. यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे. गेली महिनाभर अनेक वेळा येथे बिबट्याचे दर्शन झाले आहे.
शनिवारी सकाळी जोतिबा खिंड परिसरात उत्तम पाटील यांच्या शेतात नारळाच्या झाडावरून बिबट्या खाली उतरताना काही लोकांना दिसला. तेथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी त्याचे व्हिडिओ शूटिंग केले. या परिसरात डोंगर व गर्द झाडी असल्याने तसेच ऊस शेती असल्याने या परिसरात बिबट्याचा वावर आहे. तसेच काही दिवसांपूर्वी याच परिसरात रात्रीच्या वेळी तरसाचेही शेतकऱ्यांना दर्शन झाले होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात जाण्यास शेतकरी घाबरू लागला आहे. येडेनिपाणी परिसरात बिबट्या व त्याच्या पिल्ल्यांचे सातत्याने दर्शन होत आहे.
वन्यप्राण्यांच्या या वाढत्या हालचालींमुळे रात्रीच्या वेळी शेतात जाण्यास शेतकरी घाबरू लागले आहेत. विशेषतः ऊस शेती व झाडीच्या भागात काम करताना जीवितास धोका निर्माण होत असल्याची भावना ग्रामस्थांत आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, वन विभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.











































































