Last Updated on 23 Oct 2021 4:05 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे आणि कसे पहावे
दुबई :
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित भारत पाकिस्तानचा उद्या,रविवारी महामुकाबला होत आहे. भारत आणि पाकिस्तानचे संघ सहाव्यांदा आमनेसामने येण्यासाठी सज्ज झाले आहेत.दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघ दीर्घकाळानंतर क्रिकेटच्या मैदानावर आमनेसामने येतील. स्टार क्रिकेटर्सनी भरलेल्या दोन्ही संघांना स्पर्धेची सुरुवात विजयाने करायची आहे.
विराट कोहली भारताचे नेतृत्व करेल,तर पाकिस्तानची कमान बाबर आझमच्या हाती असेल.टी -20 च्या लढाईत दोन्ही संघ कागदावर खूप मजबूत आहेत,त्यामुळे येथे चुरशीची स्पर्धा होण्याची शक्यता आहे.
2 वर्षानंतर भारत,पाकिस्तान आमने-सामने
टी20 विश्वचषकाच्या गटामध्ये भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये आहेत. सुपर-12 फेरीतील दोन ग्रुप तयार करण्यात आले आहेत. यामध्ये भारत आणि पाकिस्तान दोघेही ग्रुप-2 मध्ये आहेत. या दोघांसोबत ग्रुपमध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 24 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही संघ तब्बल 2 वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर आमने सामने असतील. याआधी 2019 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने होती. ज्यावेळी भारताने 89 धावांनी पाकिस्तानवर विजय मिळवला होता.
आतापर्यंत भारत विरुद्ध पाकिस्तान
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण आठ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यात भारतीय संघाचे पारडे जड राहिले आहे. यात भारतीय संघाने ६ सामने जिंकले आहेत, पाकिस्तानला फक्त एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. एका सामन्याचा निकाल लागलेला नाही.
त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तान एकदिवसीय सामन्यात १३२ वेळा आमने-सामने आले आहेत. पाकिस्तानच्या नावावर ७३ तर भारताच्या नावावर ५५ एकदिवसीय सामन्यात विजयाची नोंद आहे. यातील ४ सामने रद्द झाले आहेत. याशिवाय, दोन्ही संघ ५९ कसोटीत सामन्यात लढले आहेत, ज्यात भारताने ९ सामने जिंकले आहेत तर पाकिस्तान संघाने १२ वेळा विजय नोंदवला आहे. यातील ३८ कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत.
पाकिस्तानविरुद्ध भारताने विश्वचषकावर दीर्घकाळ आपले वर्चस्व राखले आहे. एकदिवसीय आणि टी -२० विश्वचषकात पाकिस्तानी संघ भारतासमोर कधीही यश मिळवू शकलेला नाही. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघ ७ सामने खेळले असून प्रत्येक वेळी भारताने विजय मिळवला आहे. दोन्ही संघांमधील शेवटचा सामना इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत झाला होता, ज्यामध्ये भारताने ८९ धावांनी विजय मिळवला होता.
दुसरीकडे, टी -२० विश्वचषकात दोन्ही संघ ५ वेळा भिडले आहेत आणि भारतीय संघाने सर्व सामन्यांमध्ये विजयी झेंडा फडकवला आहे. कोलकाता येथे २०१६ मध्ये झालेल्या टी २० विश्वचषकात दोन्ही संघांची शेवटची गाठ पडली होती. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ गडी राखून दणदणीत पराभव केला.
मॅचचे ब्रॉडकास्ट आणि ऑनलाईन टेलिकास्ट बद्दल सर्व माहिती जाणून घेऊया.
भारत-पाकिस्तान सामना कधी होणार?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 सामना कुठे होणार?
हा सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
सामना किती वाजता होईल?
सामन्यासाठी नाणेफेक संध्याकाळी :07:०० वाजता होईल आणि पहिला चेंडू संध्याकाळी :07.30 वाजता टाकला जाईल.
थेट सामने कुठे पाहू शकतो?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिन्यांवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहता येईल. हिंदी-इंग्रजीशिवाय इतर प्रादेशिक भाषांमध्येही ते पाहता येते.
ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहायचे?
डिझनी+हॉटस्टारवर सबस्क्रिप्शनसह सामना ऑनलाईन लाइव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.
दोन्ही संघ
भारत :
विराट कोहली (कर्णधार),रोहित शर्मा (उपकर्णधार),केएल राहुल,सूर्यकुमार यादव,वृषभ पंत (wk),इशान किशन (wk),हार्दिक पंड्या,रवींद्र जडेजा,राहुल चहर,रविचंद्रन अश्विन,शार्दुल ठाकूर,वरुण चक्रवर्ती,जसप्रीत बुमराह,भुवनेश्वर कुमार,मोहम्मद शमी
पाकिस्तान :
बाबर आझम (कर्णधार),शादाब खान (उपकर्णधार),आसिफ अली, फखर जमान, हैदर अली,हरिस रौफ,हसन अली,इमाद वसीम,मोहम्मद हाफीज,मोहम्मद नवाज,मोहम्मद रिझवान,मोहम्मद वसीम जूनियर,सरफराज अहमद शाहीन शाह आफ्रिदी,शोएब मलिक
भारतीय संघाचे सुपर 12 मधील सामने :
- 24 ऑक्टोबर (रविवार) : भारत विरुद्ध पाकिस्तान : दुबई : संध्याकाळी 07.30 वाजता
- 31 ऑक्टोबर (रविवार) : भारत विरुद्ध न्यूझिलंड : दुबई : संध्याकाळी 07.30 वाजता
- 03 नोव्हेंबर (बुधवार) : भारत विरुद्ध अफगाणिस्तान : अबु धाबी : संध्याकाळी 07.30 वाजता
- 05 नोव्हेंबर (शुक्रवार) : भारत विरुद्ध स्कॉटलॅंड : दुबई : संध्याकाळी 07.30 वाजता
- 08 नोव्हेंबर (सोमवार) : भारत विरुद्ध नामिबिया : दुबई : संध्याकाळी 07.30 वाजता












































































