Last Updated on 11 Mar 2026 6:26 PM by Sanjay Patil/Adhorekhit
राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असून पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. या कडाक्याच्या उन्हात ‘उष्माघात’ (Heat Stroke) होण्याचा धोका सर्वाधिक असतो. शरीराचे तापमान संतुलित न राहिल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, नागरिक आणि पालकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उष्माघात झाल्यास शरीर काही संकेत देते, त्याकडे दुर्लक्ष करणे जीवावर बेतू शकते.
◆ प्रौढांमध्ये : शरीराचे तापमान अचानक १०४ फॅरेनहाईट (४० डिग्री सेल्सिअस) पर्यंत पोहोचणे, स्नायू आखडणे, सतत मळमळणे, चक्कर येणे आणि हृदयाचे ठोके वेगाने वाढणे.
◆ लहान मुलांमध्ये : मुले सतत चिडचिड करणे, दूध किंवा आहार घेण्यास नकार देणे, लघवीचे प्रमाण कमी होणे, डोळे शुष्क होणे आणि तोंडाची त्वचा कोरडी पडणे.
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत.
काय करावे ?
पुरेसे पाणी प्या, तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या.. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा. दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळा. सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ORS, घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा वापर नियमित करा.
अशक्तपणा, डोकेदुखी सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.तसेच गुरांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात. पंखे. ओले कपडे याचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. सूर्यप्रकाशाचा संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे. पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. तसेच बाहेर कामकाज करीत असल्यास मध्ये मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करण्यात यावा. गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी.
काय करु नये ?
उन्हात अतिकष्टाची कामे करू नका. दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नका. दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळा. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत.
तात्काळ काय करावे? एखाद्या व्यक्तीला उष्माघाताचा त्रास होत असल्याचे जाणवल्यास, त्याला तात्काळ सावलीत किंवा थंड जागी झोपवावे. शरीरावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात आणि लवकरात लवकर जवळच्या दवाखान्यात किंवा शासकीय रुग्णालयात दाखल करावे.










































































