Last Updated on 06 Jan 2026 7:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । साखर उद्योग एका संक्रमण काळातून जात असून बदलत्या परिस्थितीत कामगार संघटनेची ताकद वाढविणे,ही काळाची गरज आहे. आपले न्याय-हक्क मिळवित आपले प्रश्न मार्गी लावण्या साठी एकजुटीने संघटनेच्या पाठीशी उभा रहा,असे आवाहन वाळवा तालुका राष्ट्रीय साखर संघ (इंटक) चे अध्यक्ष व राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी केले.
वाळवा तालुका राष्ट्रीय साखर कामगार संघ (इंटक) च्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी जनरल सेक्रेटरी तानाजीराव खराडे,कार्याध्यक्ष मोहनराव शिंदे,कामगार संचालक विकास पवार,मनोहर सन्मुख,खजिन दार सचिन कोकाटे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील, कामगार नेते स्व.शंकराव भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन ज्येष्ठ कार्यकर्ते लालासाहेब वाटेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
राजेंद्र चव्हाण पुढे म्हणाले, राज्यातील साखर कामगारांचे नेते स्व.शंकरराव भोसले यांचे आपणास अखंड मार्गदर्शन व पाठबळ मिळाले आहे. मात्र सर आता आपल्यात नाहीत. आपण सर्वानी एकदिलाने कामगार संघटना वाढवीत त्यांचा वसा आणि वारसा पुढे नेणे, ही त्यांना खरी श्रद्धाजंली ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कमी वेळात आपला 10 टक्के पगार वाढीचा प्रश्न मार्गी लावला आहे. ज्या साखर कारखान्यांनी ही पगार वाढ लागू केलेली नाही, त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी ते राज्याचा दौरा करीत आहे. आपण लोकनेते राजारामबापू पाटील यांचे आदर्श आणि माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करीत आहोत. आपल्या साखर कारखान्याचे अध्यक्ष आपल्या कामगार प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेत आहेत.
जनरल सेक्रेटरी तानाजीराव खराडे यांनी विषय पत्रिकेचे वाचन करून आपण सर्वानी एकसंघपणे संघटनेस ताकद द्यावी.आम्ही आपले प्रश्न निश्चितपणे मार्गी लावू,असा विश्वास व्यक्त केला. यावेळी लालासाहेब वाटेगावकर यांनीही मार्गदर्शन केले. सोसायटी संचालक भीमराव मचाले,सदाशिव पाटील,सुनिल यादव,सुनिल पाटील,विलास थोरात,दिलीप मोहिते यांच्यासह कामगारांनी चर्चेत भाग घेतला.
प्रारंभी कामगार संचालक मनोहर सन्मुख यांनी श्रद्धांजली ठराव मांडला. खजिनदार सचिन कोकाटे यांनी संघटनेचा जमाखर्च मांडला. कामगार संचालक विकास पवार यांनी आभार मानले.
याप्रसंगी उपाध्यक्ष सुदाम पाटील,सरचिटणीस संजय शेळके,योगेश पवार,दिलीप पाटील,अशोक खोत यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी,कौन्सिल मेंबर व कामगार उपस्थित होते.














































































