Last Updated on 17 Mar 2026 10:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
कौशल्य विकास क्षेत्रात व्यापक बदल घडवून आणण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास विभागाकडून अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात पुढील दोन वर्षांत युवकांना रोजगार आणि उद्योजकतेच्या अधिकच्या नव्या संधी निर्माण होतील. असा विश्वास व्यक्त करत कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्यात कौशल्य विकासातून रोजगाराच्या नव्या संधीसाठी ३० लाख युवक-युवतींसाठी विशेष योजना सुरू करण्यात आली असल्याचे सांगितले.
विधानपरिषदेत सदस्य विक्रांत पाटील नियम ९२ अन्वये उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना मंत्री लोढा बोलत होते.
मंत्री लोढा म्हणाले, कौशल्य विकास क्षेत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यात मॉडेल करिअर सेंटरच्या माध्यमातून २०२५-२६ या वर्षात १ लाख १२ हजारावर युवकांना वैयक्तिक मार्गदर्शन करण्यात आले आहे. राज्यातील युवकांना परदेशात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुंबई विद्यापीठात स्वामी विवेकानंद कौशल्य विकास इंटरनॅशनल अकॅडमी सुरू करण्यात आली आहे. याशिवाय राज्यात आणखी सहा ठिकाणी अशा अकॅडमी सुरू करण्यात आल्या असून या अकॅडमीमध्ये विविध परदेशी भाषांचे प्रशिक्षण दिले जात आहे. याबरोबरच ईव्ही तंत्रज्ञान, रोबोटिक्स आणि ॲडव्हान्स वेल्डिंगसारख्या आधुनिक कौशल्यांचेही प्रशिक्षण दिले जात आहे.
परदेशात रोजगारासाठी जाणाऱ्या युवकांची खासगी एजन्सीकडून फसवणूक होवू नये यासाठी राज्य शासनमार्फत परकीय कंपन्यांशी कौशल्य विकास विभागामार्फत थेट समन्वय साधून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तसेच आयटीआय आणि उद्योग क्षेत्रात समन्वय साधून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.
कौशल्य विकासासाठी निधीची कमतरता नसल्याचे सांगत मंत्री लोढा यांनी सांगितले की, एडीबी बँकेकडून ४२०० कोटी रुपये, तर जागतिक बँकेकडून १४०० कोटी रुपयांचा निधी कौशल्य विकास विभागाला मिळाला आहे. या निधीतून राज्यातील सर्व आयटीआयचे आधुनिकीकरण करण्यात येत असून पुढील तीन वर्षांत प्रत्येक आयटीआयचे नूतनीकरण करण्याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतिगृहासाठी सुविधाही उभारण्यात येणार आहेत.
राज्यातील आयटीआयमध्ये इंडस्ट्रियल मॅनेजमेंट कमिटी गठित करून यामध्ये ३ हजार ७०० ट्रस्टींची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, चार्टर्ड अकाउंटंट आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधींचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच आयटीआयमध्ये टेक्निकल डायरेक्टरची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.










































































