Last Updated on 23 Feb 2026 7:49 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ढोल-ताशांच्या गजरात शिवजयंती साजरी
ईश्वरपूर ।
वाळवा तालुका शिक्षण संस्थेच्या येथील एस.डी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे शिवजयंती निमित्त उत्साहात ट्रॅडिशनल डे साजरा करण्यात आला. प्रारंभी ईश्वरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सर्व विद्यार्थ्यांनी अभिवादन केले. यावेळी आम.जयंत पाटील, वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव ॲड. धैर्यशील पाटील, महाविद्यालयाचा सर्व स्टाफ आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
महाविद्यालयात पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणे केली. यामध्ये शिवजयंती विशेष प्रस्तुती, शिवपार्वती विवाह सोहळा, खंडोबाचा जागर, जोतिबाची सासनकाठी तसेच ‘कांतारा’ या लोकपरंपरेवर आधारित सादरीकरणांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनय, नृत्य व कलागुणांद्वारे उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमासाठी मालती वसंतदादा पाटील प्राथमिक शाळा ,ईश्वरपूर च्या मुख्याध्यापिका श्रीमती इरफाना संदे परीक्षक म्हणून लाभल्या. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. जावरकर , उपप्राचार्य अमोल पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
व्यावसायिक शिक्षण घेत असताना आपल्या संस्कृती व परंपरांची जपणूक करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये एकतेची भावना, समानता व विविध कलागुणांना वाव मिळण्यास मदत होते, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.











































































