Last Updated on 06 Mar 2026 9:11 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सातारा ।
सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणाचे केंद्र असलेल्या जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती निवडीचा मुहूर्त ठरला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक २० मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक
पंचायत समिती सभापती/उपसभापती निवडणूक : जिल्ह्यातील सर्व ११ पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदांसाठी १६ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मतदान होईल. यासाठी प्रत्येक तालुक्यात उपजिल्हाधिकारी स्तरावरील पिठासन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष/उपाध्यक्ष निवडणूक : २० मार्च २०२६ रोजी जिल्हा परिषद सभागृह, सातारा येथे ही प्रक्रिया पार पडेल.
नोटीस बजावणी : याबाबत ६ मार्च २०२६ रोजी अधिकृत नोटीस काढण्यात आली असून ती बजावण्यासाठी सर्व तहसीलदारांकडे सोपवण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांनी दिली.
या निवडणुकांच्या घोषणेमुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, सत्तेच्या खुर्चीवर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










































































