Last Updated on 05 Jan 2026 7:10 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । घर, संसार आणि जबाबदाऱ्यांच्या ओझ्यात दिवस ढकलणाऱ्या महिलांसाठी रेठरे हरणाक्ष येथे तो दिवस नेहमीच्या चौकटीबाहेर पडण्याचा ठरला. हास्याचा फुलोरा, टाळ्यांचा कडकडाट, गाणी-नृत्याची रंगत आणि खेळातून उसळलेला उत्साह… या साऱ्यांनी जयंती महोत्सवाला केवळ कार्यक्रम न राहता महिलांचा उत्स्फूर्त आनंदसोहळा बनवून टाकला.
येणारा प्रत्येक दिवस आपल्या कुटुंबासाठी आणि मुलाबाळासाठी खपणाऱ्या महिलांनी रेठरे हरणाक्ष येथे विनोदी किस्से, गाणी-नृत्य, उखाणे, विविध खेळ आणि खेळ पैठणीचा खेळत मोठी धमाल केली.
वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने, तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन वर्ष व मकर संक्रांतीचे औचित्य साधून हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. हजारो महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर जल्लोषात न्हाऊन निघाला. पैठणीच्या खेळात स्मिता लोकरे (लवणमाची), माधुरी शिंदे (रेठरे हरणाक्ष) आणि शीतल पिसाळ (लवणमाची) या मानकरी ठरल्या.
जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव व प्रदेश सदस्या कमल पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन करत त्यांच्या संघटनात्मक शक्तीवर प्रकाश टाकला. सूत्रसंचालक संदीप कुडचिकर यांनी आपल्या प्रभावी व खुमासदार निवेदनाने कार्यक्रमात रंगत आणली.

तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने म्हणाल्या, “माजी मंत्री आ. जयंतराव पाटील आणि युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण तालुक्यात ‘जयंती महोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. महिलांचा वाढता प्रतिसाद हा आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.”
जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव यांनीही समाधान व्यक्त करत सांगितले की, “शाळकरी मुलींपासून ते ८० वर्षांच्या आजीपर्यंत हजारो महिलांचा सहभाग पाहून या उपक्रमाचे महत्त्व अधिक ठळक होते.”
या महोत्सवात अलका माने, रुपाली सपाटे, जयश्री पवार, कल्पना कोळेकर, नीता पाटील, मनीषा पवार, वैशाली मंडले, सरपंच शुभांगी बिरमुळे, नयना पाटील, जयश्री कदम, अनिता पिसाळ, शामल सावंत, भारती तांबवे, पूनम कदम, स्वाती पाटील, सुषमा कांबळे यांच्यासह रेठरे हरणाक्ष जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व गावांतील महिला तसेच पुरुष पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व महिला अध्यक्षांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन करत महोत्सव यशस्वी केला.














































































