Last Updated on 14 Aug 2024 5:31 PM by Sanjay Patil/Adhorekhit
रक्षाबंधन : सोमवार दिनांक 19 ऑगस्ट 2024
रक्षाबंधन हा सण,बहीण आणि भावाचा सर्वात पवित्र सण,उदय व्यापिनी पौर्णिमा…म्हणजे दिनांक 19 ऑगस्ट रोजी दिवसभर आहे.या दिवशी बहीण आपल्या भावाला दिवसभरात आपल्या सोयीने कोणत्या वेळी राखी बांधू शकते.
दि .19 ऑगस्ट 2024 रोजी भद्रा दुपारी 01.33 पर्यंत आहे.रक्षाबंधनासाठी भद्राची वेळ निषिद्ध मानली जाते,म्हणजे या दिवशी दुपारी 01. 33 पर्यंत बहिणीने आपल्या भावाला राखी बांधू नये असे काहींचे म्हणणे आहे…
पण, आदरणीय मोहनराव दाते पंचांगकर्ते सोलापूर यांच्याशी या संबंधी संवाद साधला त्यांनी असे सांगितले की,पूर्वीच्या काळी रक्षाबंधनाचा अर्थ बहिणीने भावाला राखी बांधणे एवढाच अभिप्रेत नव्हता,त्याकाळी रक्षाहोम करून रक्षासूत्र तयार करून ते राजाला बांधले जायचे,अशा पद्धतीने रक्षाबंधन विधिवत करणाऱ्यांनी भद्राकाल वर्ज्य करावा.
राखी पौर्णिमा अर्थात बहिणीने भावाच्या हाताला राखी बांधणे.याकरिता भद्रा वर्ज्य नाही आणि राखी बांधण्यासाठी कोणत्याही वेगळ्या मुहूर्ताची आवश्यकता नाही.त्यामुळे भद्राचा विचार न करता दि 19ऑगस्ट 20224 रोजी सोमवारी नेहमी प्रमाणे राखीपौर्णिमा साजरी करावी .
तसेच रक्षाबंधन हा मुंज,विवाह,वास्तु प्रमाणे मंगल कार्यासारखे नसून सामाजिक व कौटुंबिक उत्सव असल्याने भद्रा असतानाच्या काळात म्हणजे दिवसभरात आपल्या सोईने केंव्हा ही करता येईल.
ज्यांना रक्षाबंधन विधिवत् करावयाचे आहे त्यांनी खालील प्रमाणे विधी करावा व त्यासाठी भद्राकाल वर्ज्य करावा म्हणजे सकाळपासून दुपारी 1 वाजून 33 पर्यंतचा काळ वर्ज करून विधिवत रक्षाबंधन करावे.
विधिवत् रक्षाबंधन विधी : तांदूळ, सोने व पांढऱ्या मोहऱ्या किंवा दूर्वा,अक्षता,केशर,चंदन,मोहरी चे दाणे एकत्र करून त्यांची रेशमी कापडात पुरचुंडी बांधून त्याला रंगीत दोरा बांधून रक्षा अर्थात् राखी तयार करावी आणि ती देवघरात कलशावर ठेऊन तिची पूजा करावी.नंतर पुढील मंत्र म्हणत ती राखी बांधावी.
येन बद्धो बलीराजा दानवेन्द्रो महाबलः । तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल ।।
मात्र या शिवाय प्लास्टिक,स्पंज, इत्यादी पासून तयार केलेली बाजारात मिळणारी वेगवेगळ्या प्रकारची राखी बांधावयाची असेल तर भद्राकाळात सुध्दा असे रक्षाबंधन करता येईल.
असा हा बहीण – भाऊ,मित्र,समाज बांधव यांच्यातील सामाजिक सलोखा राखणारा हा रक्षाबंधन उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करावा.![]()













































































