Last Updated on 08 Nov 2023 7:07 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । तापमानाचा पारा घसरला असून राज्यात थंडीची चाहूल लागली आहे.खरीप हंगामातील पीके काढणीला आल्याने शेतकऱ्याने शेतीकामांना वेग दिला आहे.त्याचवेळी राज्यात अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे.राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे.या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.भात आणि द्राक्षाला या अवकाळीचा फटका बसणार आहे.सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.अचानक आलेल्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे.
मंगळवारी रात्री वातावरणात बदल होऊन अचानक पाऊस सुरु झाला.बुधवारी पहाटेपासूनच कोल्हापूर,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली.अचानक आलेल्या पावसामुळे बळीराजाची चांगलीच तारांबळ उडाली.अनेकांनी खरीप हंगामातील पीके झाकून ठेवण्यासाठी शेताकडे धाव घेतली.(‘अधोरेखित’ च्या Facebook ला लाईक किंवा फॉलो करा)
या पावसामुळे सांगली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस शेतामध्येच अडकला आहे.त्याचबरोबर द्राक्ष बागायतदारांना सुद्धा या पावसाचा जबरदस्त फटका बसला आहे. बुधवारी सांगली जिल्ह्यातील वातावरण ढगाळ आहे. जिल्हयात पुन्हा पाऊसाची शक्यता आहे.सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगांचा गडगडाट, सांगलीत शिडकावा तर कडेगाव, वाळवा, पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, आटपाडी, जत तालुक्यात पाऊस पहाटेपासूनच पाऊस बरसत आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात पहाटे पासून हलक्या स्वरूपाच्या पावसाची हजेरी असून पलूस तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. कडेगाव तालुक्यात पहाटेपासून संततधार पाऊस सुरु आहे.
बुधवारी पहाटेच्या सुमारास कोल्हापुरात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ऐन खरीप हंगामातील पीके काढणीला आली असताना अवकाळीचं संकट येऊन ठेपल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये रिमझिम पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. राधानगरी, भुदरगड तालुक्यात रिमझिम पाऊस सुरु आहे. भात पिकाच्या कापणीला पावसाचा फटका बसत असल्याने बळीराजा चिंतेत आहे,
सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुढील चार ते पाच दिवस जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस सुरु आहे. अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटात अडकला आहे. भातशेतीला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची चिंता आहे. कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले तालुक्यातील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.
पुढील 24 तासांत ‘या’ जिल्ह्यांना झोडपणार
दरम्यान,येत्या 24 तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. शेतकऱ्यांनी खरीप पीकांची काळजी घ्यावी, असं आवाहन देखील हवामान खात्याने केलं आहे. अरबी समुद्रात सोमवारी कमी दाबाचा पट्टा तयार झाला. त्यामुळे वार्याची चक्रीय स्थिती तयार झाली आहे.सातारा,सांगली,कोल्हापूर,सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत पुढील दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाकडून वर्तवली गेली आहे. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यातही पाऊस होईल, असे हवामान खात्याने सांगितले आहे.तर,उर्वरित राज्यात काही दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याने थंडी कमी जाणवणार आहे.












































































