Last Updated on 27 Feb 2026 12:25 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अग्निवीर आणि जवानांसाठी भारतीय रेल्वे आणि भारतीय लष्कर यांच्यात ‘सहकार्याची रुपरेषा’ जारी
नवी दिल्ली ।
अग्निवीरांना आणि माजी सैनिकांना नागरी जीवनात रोजगाराची भक्कम संधी मिळावी, यासाठी भारतीय रेल्वे आणि भारतीय लष्कराने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. दोन्ही विभागांनी “सहकार्याची रुपरेषा” (Framework of Cooperation) सादर केली असून, यामुळे अग्निवीर आणिनिवृत्त जवानांना रेल्वेत नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यामुळे निवृत्त जवानांना केवळ रेल्वेतील संधींची माहितीच मिळणार नाही, तर प्रत्यक्ष नियुक्तीपर्यंत त्यांना तांत्रिक आणि प्रशासकीय मदतही केली जाणार आहे. “देशसेवेतून नागरी सेवेकडे” होणारा हा प्रवास सुखकर व्हावा, हा यामागचा मुख्य हेतू आहे.
हा उपक्रम केवळ रोजगारापुरता मर्यादित नसून, राष्ट्रीय विकासात माजी सैनिकांच्या कौशल्याचा उपयोग करून घेण्याची एक मोठी संधी आहे. माजी सैनिकांना करिअरचे अर्थपूर्ण आणि सन्मानजनक मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारची ही ‘सामायिक वचनबद्धता’ देशप्रेमी नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
माजी सैनिकांसाठी नोकरीच्या प्रमुख संधी
सैन्य दलातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि पुनर्वसन हा भारतीय रेल्वेच्या धोरणात्मक चौकटीचा महत्त्वाचा घटक आहे.
माजी सैनिक आणि माजी अग्निवीरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी:
◆ माजी सैनिकांसाठी स्तर-2/वरील पदांमध्ये 10 टक्के सरळ आरक्षण आणि स्तर-1 पदांमध्ये 20 टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.
◆ याव्यतिरिक्त, माजी अग्निवीरांसाठी स्तर-2/ त्यावरील पदांमध्ये 5 टक्के तर स्तर-1 पदांमध्ये 10 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
2024 आणि 2025 या वर्षांमध्ये, रेल्वेतील रिक्त पदांच्या अधिसूचनांमध्ये एकूण 14,788 पदे माजी सैनिकांसाठी राखीव ठेवण्यात आली होती, त्यामध्ये समाविष्ट असलेली पदांची संख्या:
➤ स्तर-1 मधील 6,485 पदे
➤ स्तर-2/त्यावरील 8,303 पदे
कंत्राटी नियुक्त्यांद्वारे तात्काळ सहभाग
माजी सैनिकांच्या जलद गतीने नियुक्त्या करण्यास चालना देण्यासाठी आणि विद्यमान रिक्त पदांची पूर्तता करण्यासाठी, रेल्वे मंत्रालयाने नियमित भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत भारतीय रेल्वेमध्ये माजी सैनिकांची ‘पॉइंट्समेन’ म्हणून कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या झोनल आणि डिव्हिजनल पातळीवर 5 हजाराहून अधिक स्तर-1 पदांच्या भरतीसाठीची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत 9 डिव्हिजन्सनी ‘पॉइंट्समेन’च्या नियुक्तीसाठी संबंधित लष्करी संघटनांसोबत सामंजस्य करार केले आहेत.












































































