Last Updated on 21 Mar 2026 9:31 AM by Sanjay Patil/Adhorekhit
पिढयानपिढयापासून चालत आली ही परंपरा
या गावात ही परंपरा सुमारे सव्वाशे वर्षापासून सुरु
वेळ रात्री-अपरात्रीची असली तरीही पार पाडला जातो रक्षाविसर्जन विधी
राज्यातील ‘बहे’ हे बहुदा एकमेव गाव
![]()
सांगली ।
सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील बहे येथे गेल्या अनेक वर्षापासून चालत आलेली अंत्यसंस्कारानंतर लगेच रक्षाविसर्जन ही परंपरा आजही पुढे चालू आहे.अंत्यसंस्कार आणि रक्षाविसर्जन हे एकाचवेळी अशी परंपरा असणारे हे राज्यातील बहुदा एकमेव गाव मानले जाते.प्लेगची साथ आणि कृष्णेच्या पात्रातील कमी-जास्त होणारे पाणी यामुळे ही परंपरा सुरु झाल्याचे गावातील वयोवृद्ध सांगतात.
राज्यात हिंदू धर्मात पिढयानपिढया पासून अनेक प्रथा-परंपरा-रिति-रिवाज चालत आलेले आहेत.काही रितीरिवाज,रूढी,परंपरा यांना शास्त्रीय बैठकही होती.काही प्रथा परंपरांमुळेही काही गावे ओळखली जातात.बहे गावाला प्रभू रामचंद्रांमुळे राज्यभर ओळखले जाते.कृष्णा नदीतील बेटावर प्रभु रामचंद्रांचे प्रसिद्ध पुरातन मंदिर आहे.त्याचबरोबर या गावाला आणखी एक जुनी ओळख आहे.येथे मृतांवर अंत्यसंस्कारानंतर लगेचच रक्षाविसर्जनविधी पार पाडला जातो.वाळवा तालुक्यात कृष्णा नदीच्या कुशीत वसलेले बहे सुमारे साडेचार हजार लोकवस्तीचे गाव ! या गावात ही परंपरा सुमारे सव्वाशे वर्षापासून सुरु असल्याचे सांगण्यात येते.

प्रातिनिधिक छायाप्रत
एखाद्या घरात प्लेगचा रुग्ण आढळल्यानंतर लगेच त्याचा मृत्यू होत होता.प्लेगामुळे त्यावेळी अनेकांचे मृत्यू झाले.त्यावेळी काही गावांमध्ये संपूर्ण स्मशानकळा आली होती.मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येत होते.या साथीची तीव्रताच इतकी होती,की एकाला नदीवर पोहोचवल्यानंतर परत येताना पुढच्याला खांदा देण्याची तयारी ठेवावी लागत होती. इतकी भीषण परिस्थिती त्यावेळी होती.बहे येथेही तशीच परिस्थिती झाली होती.मृतांची वाढती संख्या आणि दहन द्यायला जागाच शिल्लक रहात नव्हती,त्यातच नदीचे वाढते पाणी यामुळे अंत्यसंस्कारानंतर लगेचच माती लोटली जात होती.
राज्यातील बहुतांश गावामध्ये काही अपवाद वगळता तिसऱ्यादिवशी रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम घेतला जातो.
त्यावेळी सुरु झालेली परंपरा आजही कायम आहे.एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर कृष्णा नदीकाठी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातात.त्यानंतर त्याची सुमारे तीन-चार तासानंतर पूर्ण राख झाल्यानंतर लगेच माती लोटण्याचा (रक्षाविसर्जन) कार्यक्रम त्याचठिकाणी घेतला जातो.मग वेळ रात्री-अपरात्रीची असली तरीही रक्षाविसर्जन विधी पार पाडला जातो. अंत्यविधीसाठी आलेले ग्रामस्थ,पै-पाहुणे,मित्रमंडळींना सुमारे चार तास तेथे थांबावे लागते. माती लोटल्यानंतरच सर्वजण घरी येतात.
बहे येथे कृष्णातीरी बह्याबरोबरच हुबालवाडी,कापूसखेड,नेर्ले,इस्लामपूर शहरातील अनेकजण येथे अंत्यसंस्कारासाठी येतात. तेही येथील परंपरेप्रमाणे अंत्यसंस्कार अन रक्षाविसर्जन एकाचवेळी करतात. एकाचवेळी अंत्यसंस्कार आणि रक्षाविसर्जन ही राज्यात बहुदा कोठेही पाहावयास मिळत नाही.त्यावेळेपासून सुरु झालेली परंपरा आजही जपली जाते.

प्रातिनिधिक छायाप्रत
![]()










































































