Last Updated on 26 Feb 2026 2:03 PM by Sanjay Patil/Adhorekhit
प्रशासनाची ‘गांधारी’ची भूमिका कायम?
सांगली ।
कृष्णा नदीच्या पात्रात रसायनयुक्त सांडपाणी आणि मळी मिसळल्याने गुरुवारी सकाळी फार्णेवाडी, बहे, बोरगाव बंधारा परिसरात परिसरात हजारो मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नदीपात्रात ठिकठिकाणी मृत माशांचे खच पडले असून, यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
गुरुवारी सकाळी-सकाळी बहे बंधारा आणि फार्णेवाडी परिसरात मासे तडफडताना दिसू लागल्याने नागरिकांनी मासे पकडण्यासाठी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी बादल्या आणि पोती भरून हे मासे घरी नेले. मात्र, हे मासे विषारी पाण्यामुळे मृत झाले असल्याने ते खाणे आरोग्यासाठी घातक ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा – कृष्णा नदीचा जीव गुदमरतोय; तरीही प्रशासन बधिर का?
गेल्या तीन वर्षांपासून दरवर्षी या दिवसांत असेच प्रकार घडत आहेत. स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे की, कारखान्यांचे रसायनयुक्त आणि प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट नदीत सोडले जात आहे. यामुळे नदीतील पाण्याची गुणवत्ता खालावली असून, जलचर सृष्टीचा नाश होत आहे. नदीकाठच्या नागरिकांना त्वचारोग, श्वसनाचे त्रास आणि इतर गंभीर आजारांनी ग्रासले आहे.

प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष?
नदीत सोडले जाणारे रसायनयुक्त पाणी आणि मळी यामुळेच हा प्रकार घडत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि तालुका प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, याला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
ग्रामपंचायतीचे आवाहन…
दरम्यान, कृष्णा नदी पात्रात मळीमिश्रीत पाण्यामुळे पाणी दुषित झाले आहे तरी पिण्याचे पाणी उकळून व काटकसरीने वापरावे याची ग्रामस्थांनी नोंद घ्यावी व ग्रामपंचायतीस सहकार्य करावे असे आवाहन बहेसह नदीकाठच्या ग्रामपंचायतींनी केले आहे.










































































