Last Updated on 01 Aug 2024 9:58 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली | पॅरिस ऑलिम्पिक नेमबाजीत कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळे याने कांस्य पदक जिंकले. आज झालेल्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन इव्हेंटमध्ये त्याने हे पदक मिळवले.
नेमबाजीत भारताला हे तिसरे पदक मिळाले आहे. याआधी मनू भाकरने दोन तर सरबज्योत सिंगने एक कांस्यपदक जिंकले आहे. स्वप्निलचे ५९० गुणांसह सातवे स्थान मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.या फेरीत टॅाप आठ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले होते.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजी संघात निवड झालेला स्वप्निल हा महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू आहे. तो मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथील आहे. त्याने पुण्यातील बालेवाडीत क्रीडा प्रबोधिनीमध्ये नेमबाजीचा सराव केला आहे.
तब्बल ७२ वर्षांनी कोल्हापूरला पदक
कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेमबाजपटू स्वप्निल सुरेश कुसाळने पॅरिस ऑलिम्पिकपद पदक जिंकले. त्याने कास्यपदक जिंकताच केवळ कोल्हापूर महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशात आनंदोत्सव सुरू झाला आहे. तब्बल 72 वर्षांनी कोल्हापूरच्या खेळाडूंनी ऑलम्पिक मध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात पदक मिळवले. १९५२ मध्ये हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिपिक स्पर्धेमध्ये खाशाबा जाधव यांनी कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथील हा खेळाडू. वडील सुरेश कुसाळे हे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक. तर आई अनिता या कांबळवाडीच्या लोकनियुक्त सरपंच आहेत.
दिनांक 6 ऑगस्ट 1995 रोजी पुणे इथे एका शेतकरी कुटुंबात स्वप्निल कुसळेचा जन्म झाला. 2009 मध्ये स्वप्निलच्या वडीलांनी त्याला महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक क्रीडा उपक्रम–क्रीडा प्रबोधिनीत प्रवेश घेऊन दिला.तेव्हापासून त्याचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. एक वर्ष कठोर शारिरीक प्रशिक्षणानंतर एका क्रीडाप्रकाराची निवड करण्याची वेळ आली तेव्हा त्याने नेमबाजीची निवड केली. 2013 मध्ये त्याला लक्ष्य स्पोर्ट्सचे प्रायोजकत्व मिळाले.2015 मध्ये कुवेतमध्ये झालेल्या आशियाई नेमबाजी विजेतेपद स्पर्धेत त्याने 50 मी. रायफल प्रोन 3 प्रकारात जुनिअर गटात सुवर्ण पदक पटकावले. तुघलकाबाद इथे झालेल्या 59 व्या राष्ट्रीय नेमबाजी विजेतेपद स्पर्धेत त्याने 50 मी. रायफल प्रोन प्रकारात गगन नारंग आणि चैन सिंहला मागे टाकत विजेतेपद मिळवले. याच इतिहासाची पुनरावृत्ती त्याने तिरुवनंतपुरम इथे झालेल्या 61व्या राष्ट्रीय विजेतेपद स्पर्धेत 50 मी. रायफल 3 पोझिशन प्रकारात सुवर्ण पदक पटकावून केली.
ऐतिहासिक ऑलिम्पिक पदकापर्यंतच्या प्रवासात स्वप्नील कुसाळे याने अनेक स्पर्धांमध्ये उत्तम यश मिळवले आहे.
- जागतिक विजेतेपद, कैरो (2022) – चौथे स्थान मिळवून भारतासाठी ऑलिम्पिक कोटाद्वारे पात्र ठरला .
- आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 – सांघिक प्रकारात सुवर्ण पदक.
- विश्वचषक, बाकू (2023) – मिश्र सांघिक प्रकारात सुवर्ण आणि वैयक्तिक व सांघिक प्रकारात दोन रौप्य पदके.
- जागतिक विजेतेपद, कैरो (2022) – सांघिक प्रकारात कांस्य पदक.
- जागतिक चषक, नवी दिल्ली (2021) – सांघिक प्रकारात सुवर्ण पदक.
स्वप्नील कुसाळे याचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
नवी दिल्ली | पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात कांस्यपदक जिंकणाऱ्या स्वप्नील कुसाळे याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले;
स्वप्नील कुसाळे याची अत्यंत विलक्षण कामगिरी! पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात कांस्यपदकाची कमाई केल्याबद्दल त्याचे अभिनंदन.
त्याचे हे यश अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण त्याने या स्पर्धेत उत्तम लवचिकता आणि कौशल्याचे दर्शन घडवले आहे. या क्रीडाप्रकारात पदक मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू देखील ठरला आहे.
प्रत्येक भारतीयाचे मन आनंदाने भरुन गेले आहे.”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नेमबाज स्वप्नील कुसाळेचे अभिनंदन
मुंबई | पॅरीस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कांस्यपदकाचा वेध घेणारा स्वप्नील कुसाळे महाराष्ट्राचा अभिमान आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलचे अभिनंदन केले आहे. कोल्हापुरच्या नेमबाज स्वप्नील कुसाळे याने नेमबाजीत ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्य पदक पटकावले आहे.
मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, स्वप्नीलमुळे कुस्तीमध्ये भारतासाठी वैयक्तिक असे पहिले पदक पटकावणाऱ्या खाशाबा जाधव यांचे स्मरण झाले. तब्बल ७२ वर्षांनी स्वप्नीलने महाराष्ट्रासाठी या पदकाचा वेध घेऊन, तशाच पद्धतीचा आनंद आणि उत्साह राज्यातील क्रीडा क्षेत्रासाठी निर्माण केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नेमबाजीची एक मोठी परंपरा आहे. ही परंपरा स्वप्नीलने कायम राखली आहे. कांबळवाडी सारख्या ग्रामीण भागातून येऊन स्वप्नीलने आपले राज्य आणि देशाचे नाव आंतरराष्ट्रीयस्तरावर झळकवले आहे. देशासाठी वैयक्तिक पदकाची कमाई करताना, स्वप्नीलने महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्रातील गौरव वाढवला आहे. स्वप्नीलच्या या यशात त्यांचे कुटुंबिय, प्रशिक्षक, मार्गदर्शक यांचे मोलाचे योगदान आहे, या सर्वांचे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्यावतीने अभिनंदन, असे नमूद करून मुख्यमंत्र्यानी यापुढेही स्वप्नीलच्या वाटचालीसाठी आवश्यक असे सर्व ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली आहे. तसेच त्याला स्पर्धेतील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.












































































