Last Updated on 20 Sep 2023 8:10 AM by Sanjay Patil/Adhorekhit
अधोरेखित ऑनलाइन डेस्क । वर्ष 2024 मधील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या परीक्षांची तयारी करत असलेल्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे.नॅशनल टेस्टिंग एजन्सी, म्हणजेच NTA ने (NTA Exam Calendar 2024) पुढील शैक्षणिक वर्षातील महत्त्वाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.यामध्ये जेईई (JEE), नीट (NEET) आणि सीयूईटी (CUET) अशा कित्येक परीक्षांचा समावेश आहे.2024-25 वर्षांसाठीचे हे वेळापत्रक असणार आहे.त्यानुसार जेईई दोन टप्प्यात होणार असून,ऑनलाइन परीक्षांचे निकाल परीक्षेनंतर तीन आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहेत.
एनटीएने एका पोस्टच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.यानुसार, जेईई मेन सेशन 1 (JEE Main) ही परीक्षा 24 जानेवारी 2024 ते 1 फेब्रुवारी 2024 या दरम्यान होणार आहे.तर जेईई मेन सेशन 2 हे 1 एप्रिल 2024 ते 15 एप्रिल 2024 या दरम्यान पार पडेल.या दोन्ही परीक्षा CBT (Computre Based Test) या पद्धतीने होणार आहेत.
ऑनलाइन परीक्षांचे सर्व निकाल परीक्षा झाल्यानंतर पुढील तीन आठवड्यांमध्ये जाहीर केले जाणार आहेत. तर नीट परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाईल,असे स्पष्ट करण्यात आले.विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी NTA च्या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक पदासाठी पात्रता परीक्षा यूजीसी नेट ही 10 ते 21 जून दरम्यान ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षा असल्याने,परीक्षेची अनेक उमेदवार वाट पाहतात.त्यामुळे एनटीएने वेळापत्रक प्रसिद्ध करून दिलासा दिला आहे.
NEET
नॅशनल एलिजिब्लिटी कम एन्ट्रान्स टेस्ट (NEET-UG), जी पेन टू पेपर/ओएमआर फॉर्मॅटमध्ये घेतली जाते, ती 5 मे 2024 रोजी पार पडेल. या परीक्षेचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात लागेल, असेही सांगण्यात आले आहे.
CUET
कॉमन युनिवर्सिटी एन्ट्रान्स टेस्ट (CUET) याची यूजी आणि पीजी परीक्षा ही वेगवेगळी घेण्यात येणार आहे. CUET-UG ही परीक्षा 15 मे ते 31 मे 2024 दरम्यान पार पडेल.तर, CUET-PG ही परीक्षा 11 ते 28 मार्च दरम्यान पार पडेल.या परीक्षा देखील CBT पद्धतीने घेतल्या जातील.
NET
यूजीसी-नेट (UGC NET) परीक्षा ही 10 जून ते 21 जून 2024 या दरम्यान घेतली जाणार आहे.असिस्टंट प्रोफेसरशिप आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी ही परीक्षा घेतली जाते.










































































